लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणात १५ टक्के लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यात सर्वाधिक प्रमाण पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील असून हे लसीकरण सशुल्क पद्धतीचे आहे. या तीन शहरांत ८५ टक्के लसीकरण खासगी क्षेत्रातील आहे.
खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठा अधिक असल्यामुळे लसीचा तुटवडा भासत नाही. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ९८ लाख लसींच्या डोसपैकी ६५ लाख कोविशिल्ड आणि ३३ लाख कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले. त्यातील ७० टक्के डोस हे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात देण्यात आले. त्यात ४० लाख कोविशिल्ड आणि २९ लाख कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. तर गोदरेज रुग्णालयाने ३ लाख लसींचे डोस, जसलोक आणि नानावटी रुग्णालयाने प्रत्येकी अडीच लाख लसींचे डोस देण्यात आले. सूर्या रुग्णालयात १ लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. शहर, उपगरातील अन्य १७० रुग्णालयांना केवळ काही हजारांत लसींचा डोससाठा प्राप्त झाला आहे.
राज्यात झालेल्या एकूण सात कोटी लसीकरणापैकी १ कोटी ३ लाख लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाले आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील दोन तृतीयांश जिल्ह्यांत सशुल्क लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईत ४३ लाख, पुण्यात २७ लाख, ठाण्यात १७ लाख लसींचे डोस खासगी क्षेत्रातील आहेत. त्यानंतर रायगड ३.३४ लाख, औरंगाबाद २.४१ लाख, नागपूर १.४६ लाख आणि कोल्हापूरमध्ये १.७ लाख लसींचे डोस खासगी क्षेत्रातील आहेत.
चौकट
तरुणांचे ८० टक्के लसीकरण
मुंबईत तरुण लाभार्थ्यांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, यातील ४३ टक्के लाभार्थ्यांनी खासगी क्षेत्राला पसंती दिली आहे. याखेरीज, नांदेडमध्ये ३० टक्के, हिंगोली ३३ टक्के आणि नंदुरबारमध्ये ३६ टक्के सशुल्क लसीकरण पार पडले आहे.