मुंबई : तलाव क्षेत्रात गेले दोन दिवस तुरळक बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी जोर धरला. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये शनिवारी सकाळपर्यंत ३८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण १५ टक्के जलसाठा तलावांमध्ये आहे. आणखी दीड महिना पुरेल एवढा हा जलसाठा आहे.
गेल्या आठवड्यात तलावांमध्ये जेमतेम चार टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीसंकट घोंघावत होते. मान्सून लांबणीवर पडल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल एक लाख ४५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.१५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आणखी १२ लाख ३० हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढण्याची गरज आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात तलावांमध्ये चांगला पाऊस पडल्यास पाणीटंचाईचे टेन्शन मिटेल.
- मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे.
- मुंबईला पाणीपुरवठा करणाºया आजच्या तारखेला दोन लाख १६ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गेल्या तीन वर्षांमधील हा सर्वांत कमी जलसाठा आहे.
- मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर जलसाठा करण्यात येतो. १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू आहे.