१५ वर्षांच्या बहाद्दर सहिष्णू जाधवने १६ तासात इंग्लिश खाडी केली पार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:06 PM2023-09-18T16:06:59+5:302023-09-18T16:07:48+5:30
सहिष्णूने इंग्लिश चॅनल स्विम रिले यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखविले आहे.
दृढनिश्चय, धैर्य आणि सहनशीलता या त्रिगुणात्मक सूत्रांमुळे यशाला कशी गवसणी घालता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे विस्मयकारक प्रदर्शन करणारा पंढरपूरचा १५ वर्षीय भारतीय जलतरणपटू सहिष्णू जाधव होय. सहिष्णूने इंग्लिश चॅनल स्विम रिले यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखविले आहे. अद्वितीय आणि उल्लेखनीय कामगिरीने केवळ भारतीयच नव्हे तर ओपन वॉटर स्वीमिंग प्रकारात यश मिळवण्याचे स्वप्न असलेल्या असंख्य युवा खेळाडूंना सहिष्णूने प्रेरित केले आहे. सहिष्णू जाधव हा आव्हानात्मक जलतरण रिले पूर्ण करणाऱ्या सर्वात तरुण व्यक्तींपैकी एक बनला असून, त्याने पोहोण्याच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. आजवर केवळ ६२ भारतीयांनी इंग्लिश चॅनल यशस्वीरीत्या पोहून पार केली आहे. सहिष्णूचा प्रवास आठ महिन्यांपूर्वी सुरू झाला जेव्हा त्याने हे प्रचंड अवघड आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
४० किमीचे खडतर अंतर केले पूर्ण
इंग्लिश चॅनल स्विम रिले हे एक सांघिक कौशल्य आहे. सहिष्णूची निवड यूकेमधील टीम मेनकॅप मार्वेल्स या संघाने आणि टीममेट्सनी केली होती.
महाकाय इंग्लिश चॅनलच्या थंडगार पाण्यातून पोहत या संघाने उत्तम सांघिक कार्य केले. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता सुरू झाले.
इंग्लंड ते फ्रान्स हे सुमारे ४० किलोमीटरचे खडतर आणि आव्हानात्मक पोहणे १६ तासांमध्ये सहिष्णू आणि टीमने पूर्ण केले.
इंग्लिश प्रशिक्षक निक्की पोप आणि ट्रेसी क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने डोव्हर येथे प्रशिक्षण घेतले. सहिष्णूचे कौशल्य , शारीरिक आणि मानसिक कणखरपणा वाढवण्यात त्यांनी भूमिका बजावली. सहिष्णूला चॅनेल ओलांडण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरिता प्रशिक्षण सत्रांमध्ये लांब-अंतराचे तासनतास पोहणे, थंड-पाण्यातील सराव आणि खाडीच्या परिस्थितीचे आकलन करणे या सर्व बाबी समाविष्ट होत्या.
अभिमानाची गोष्ट
इंग्लिश चॅनलच्या जलतरण रिलेमध्ये सहिष्णूचा उल्लेखनीय पराक्रम केवळ पंढरपूर वा महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट नसून भारतसाठीदेखील ती गौरवाची गोष्ट आहे. आणि ती जलतरणपटूंच्या भावी पिढ्यांना प्रेरित करणारी आहे. सहिष्णू नजीकच्या भविष्यात एकट्याने (सोलो) इंग्लिश खाडी पोहण्याची तयारी करत आहे.