'अब कभी नहीं आऊंगा'; गेमसाठी मुलाची आत्महत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:56 PM2022-06-10T12:56:16+5:302022-06-10T12:57:08+5:30
आईने विरोध केल्याचा राग; मालाडमध्ये रेल्वेखाली दिला जीव
मुंबई : अलीकडे एका मुलाने मोबाइल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे बाहुलीला फाशी देत, त्यानंतर स्वत: गळफास घेतला. ही घटना ताजी असतानाच आईने मोबाइलवर गेम खेळण्यास विरोध केल्याने १५ वर्षीय मुलाने रागाच्या भरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मालाडमध्ये घडली. त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला.
ओम भरत कथोरिया (१५) असे या मुलाचे नाव असून तो सतत मोबाइलवर गेम खेळण्यात रमलेला असायचा. त्यामुळे आईने त्याला मोबाइलवर गेम खेळण्यास विरोध केला. त्याचा राग ओमने मनात ठेवला आणि सरळ रेल्वे रुळावर जाऊन रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार मालाड परिसरात गुरुवारी उघडकीस आला. त्याने लिहिलेली सुसाईड नोट घरच्याना मिळाली तेव्हा त्यांनी ओमची शोधाशोध सुरू केली.
यादरम्यान, कुटुंबीयांना ओम याचा छिन्नविच्छिन्न मृतदेह कांदिवली मालाड रेल्वे ट्रॅकवर आढळला. मालाड पूर्वच्या सीओडी कंपाउंडजवळ कथोरिया कुटुंब राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा ओम हा बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास मोबाइलवर गेम खेळत होता. तेव्हा त्याच्या आईने हातातून मोबाइल काढून घेत दिवसभर गेम खेळणार तर अभ्यास कधी करणार? असे म्हणत गेम खेळण्यास विरोध केला. त्यामुळे ओम आईवर रागावला आणि घराबाहेर निघून गेला.
मैं जा रहा हू,अब कभी नहीं आऊंगा-
ओमची आई घरी आली आणि तिला एक पत्र मिळाले. त्यात ‘मैं जा रहा हू, अब कभी नहीं आऊगा’,असे त्याने लिहिले होते. त्यानंतर त्याच्या आईने कुटुंबियांसह पोलीस ठाणे गाठले. दिंडोशी पोलिसांनीदेखील ओमचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान मालाड कांदिवली परिसरात लहान मुलाचा रेल्वे रुळांवर मृतदेह सापडला, अशी माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. त्यांनी मृतदेह ओमचा असल्याची खात्री केली.
अपघाती मृत्यूची नोंद-
आम्ही मोटरमनकडे चौकशी केली, तेव्हा मुलाने रेल्वे रूळ ओलांडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार अपघाती मृत्यूची नोंद केल्याचे बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.