२६/११ ची १५ वर्षे: रेल्वेची सुरक्षा रामभराेसे..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:39 AM2023-11-26T06:39:21+5:302023-11-26T06:40:17+5:30

15 Years of 26/11 Terror Attack: २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत.

15 Years of 26/11: Railway Security? | २६/११ ची १५ वर्षे: रेल्वेची सुरक्षा रामभराेसे..?

२६/११ ची १५ वर्षे: रेल्वेची सुरक्षा रामभराेसे..?

मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासह इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हाेते.

आज या हल्ल्याला १५ वर्षे झाली. तरीही या घटनेतून रेल्वे प्रशासनाने काहीही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. आजच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्थानकात मेटल डिटेक्टर बंद तर बॅग स्कॅनर नाही, तर चर्चगेट स्थानकात  बॅग स्कॅनर असूनही योग्य रीतीने तपासणी केली जात नाही. या सर्वाचा आढावा घेतला असता रेल्वे प्रशासन २६/११च्या पुनरावृत्तीची वाट पाहतेय का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सीएसएमटी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक हे देशातील सर्वात गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकात प्रचंड गर्दी असते. २६/११ला दहशवाद्यांनी हल्ला केला होता; परंतु, सीएसएमटी स्थानकात मेटल डिटेक्टर बंद तर बॅग स्कॅनर बसवलेले नाही. सीएसएमटी स्थानकात एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत; परंतु, त्या ठिकाणी असलेले मेटल डिटेक्टर बंद आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या जातात त्या ठिकाणचे बॅग स्कॅनर बंद पडल्याने काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही बॅगची, ना प्रवाशाची तपासणी होते, अशी अवस्था आहे. 

चर्चगेट
चर्चगेट स्थानक परिसरात अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने प्रवाशांची वर्दळ असते. या स्थानकावरही काही ठिकाणी मेटल डिटेक्टर बसवलेलेच नाहीत.  

दादर
दादर स्थानक हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे प्रवाशांची गर्दी असते. दादर रेल्वेस्थानकात मध्य रेल्वे प्रवेशद्वाराचे मेटल डिटेक्टर बंद पडले आहेत. तेथे बॅग स्कॅनरही नाही. 

आरपीएफ जवानांची कमतरता 
मध्य रेल्वेवर एकूण १६०० आरपीफ जवानांची आवश्यकता असून, ८०० जवानांची कमतरता आहे.  पश्चिम रेल्वेवर २ हजार आरपीफ जवानांची आवश्यकता आहे; परंतु १२०० जवान असून, ८०० जवानांची कमतरता आहे. 

मध्य रेल्वे परिसरात बॅग स्कॅनर मशिन बंद पडल्याने काढून टाकण्यात आल्या आहेत. काही मेटल डिटेक्टर खराब झाले आहेत. नवीन बॅग स्कॅनर मशिन मेटल डिटेक्टर घेण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच स्थानकात बसविले जातील. 
- डॉ. शिवराज मानसपुरे
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

२६/११च्या घटनेनंतर रेल्वेने काही धडा घेतला नाही. स्थानकांच्या सुरक्षेविषयी प्रशासनामध्ये गांभीर्य नाही. रेल्वे केवळ सुरक्षेचा देखावा करते; प्रत्यक्षात बिकट परिस्थिती आहे. २६/११ची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहायची का?  
- नंदकुमार देशमुख
अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ

पंधरा वर्षे झाली. रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा वाढवली. मात्र, आता अनेक स्थानकांवर डोअर मेटल डिटेक्टर आणि स्कॅन मशिन बंद आहे. प्रवाशांची सुरक्षा कागदावर आहे. रेल्वेने तात्काळ सर्व मेटल डिटेक्टर आणि स्कॅन मशीन दुरुस्त करावेत. 
- सुभाष गुप्ता
अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Web Title: 15 Years of 26/11: Railway Security?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.