लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे १५० कोटींची देणी थकली आहेत.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात १८ हजारांहून अधिक बसगाड्या, राज्यातील २५० आगार व ६०९ बसस्थानके, लाखभर कर्मचारी असा मोठा गाडा सांभाळणारी एसटी आशियातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन सेवा मानली जाते. तरीही २०१९ पासून ६००० कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे मुंबई येथील मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदरची रक्कम मिळाली आहे. मात्र आगारात काम करून निवृत्त झालेल्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी यांना पैसे दिलेले नाहीत. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्यांना पैसे मिळाले नाही. त्यांना सापत्न वागणूक का, असा सवाल कर्मचारी विचारत आहेत.
निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी तत्काळ व्याजासह मिळावीत यासाठी परिवहनमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करावा. श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस