Join us  

मुंबईत दहीहंडी उत्सवात १५० कोटी रुपयांची उलाढाल; एक दिवसाचा उत्सव अन् कोट्यवधींच्या खर्चाचा थर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:52 PM

मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल झाली. 

मुंबई :

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला राजकीय नेत्यांसह त्यांच्याशी संबंधित बिल्डरचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळाले.  मुंबईतदहीहंडी उत्सवादरम्यान अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल झाली. 

मुंबई व परिसरात आजच्या घडीला २०० पेक्षा जास्त लहान-मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. याबाबत प्रतिक्रिया देताना नीलेश जाधव या गोविंदाने सांगितले की, आमचा सराव किमान महिनाभर आधी सुरू होतो. त्यावेळी आमचे टी-शर्ट, खाण्यापिण्याची व्यवस्था राजकीय नेत्यांकडून केली जाते. दहीहंडीच्या दिवशी ट्रक भाड्याने घेणे, कार्यकर्त्यांचा विमा, सोबत ढोल पथक, दिवसाचे खाणे-पिणे असा किमान एक दिवसाचा खर्च एखाद लाखाच्या घरात जातो. मात्र, आमच्या हातात प्रत्यक्ष पैसे दिले जात नाहीत. हे पैसे संबंधित लोकांना थेट दिले जातात. हंडी फोडून मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम मात्र मंडळासाठी वापरण्यात येते, असेही जाधव याने सांगितले.

सेलिब्रिटींच्या मानधनावर खर्चएका आयोजकाच्या म्हणण्यानुसार, ११ लाख, २५ लाखांच्या बक्षिसाबराेबरच महागड्या सेलिब्रिटींना दहीहंडीच्या ठिकाणी आणल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. यात जास्त खर्च हा प्रामुख्याने सेलिब्रिटींच्या मानधनावर होतो. यंदा गौतमी पाटील आणि राधा पाटील यांचे आकर्षण जास्त होते. काही मोठे अभिनेते मानधन न घेता केवळ संबंधित राजकीय नेत्याशी संबंध जोपासण्यासाठी येतात, असेही त्याने सांगितले. सेलिब्रिटींवरील खर्चानंतर सर्वाधिक खर्च हा डीजेवर होतो. यावर किमान ३५ हजार ते कमाल तीन लाखांपर्यंत खर्च होतो.

कांदिवलीत तणाव; पोलिसांचा हस्तक्षेपदहीहंडीच्या उत्सवात कांदिवली परिसरात दहीहंडीवरून काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र समतानगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.  मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वच्या हनुमाननगर परिसरात स्थानिकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी एका पक्षाचा बॅनर पडून फाटला. हे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. दहीहंडी बांधणाऱ्या मुलांनी खोडसाळपणे हा बॅनर पाडला किंवा फाडला असा त्यांचा समज झाला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते तेथे जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. परिणामी, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, समतानगर पोलिसांच्या पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

...आणि जमाव शांत झालाबॅनर ज्या ठिकाणी पडला तेथे पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्यामुळे तेथील फुटेज पडताळण्यात आले. तेव्हा तो बॅनर कोणीही पाडला नसून तो हवेने पडल्याचे त्यात दिसले. पोलिसांनी ही माहिती घोषणाबाजी करणाऱ्यांना दिली आणि त्यांची समजूत काढली. त्यामुळे हा सगळा प्रकार शांत झाला.

टॅग्स :दहीहंडीमुंबई