लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन वर्षांपूर्वी सततच्या पावसामुळे खड्डे झाले होते. महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी गत वर्षी एप्रिल ते मे महिन्यामध्ये सुमारे १५० कोटी रुपये खर्च करुन दोन्ही रस्ते अद्ययावत करुन सुधारणा केल्या होत्या त्यामुळे . त्यातून रस्ते सुस्थितीत हिले. या दोन्ही मार्गांवर या वर्षी देखील आवश्यक असेल त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल. मात्र त्याचे प्रमाण फारसे नसेल. परिणामी यंदा १५० कोटी रूपये खर्च करण्याची गरज भासणार नाही.
शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेताना दोन्ही महामार्गावरील रस्त्यांवर करण्यात आलेल्या सुधारणांविषयी सांगितले. स्वच्छता गृहाच्या पाहणी दरम्यान म्हाडा व तत्सम प्राधिकरणांच्या ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था नसेल तिथे आठवडाभरात विद्युत प्रकाश व्यवस्था पुरवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सखोल स्वच्छता मोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धत (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसारच कार्यवाही केली जात आहे. प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त सकाळी ७ ते ७.३० दरम्यान प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आहेत. जीपीएसच्या आधारे दररोज खातरजमा केली जात आहे. जे सहायक आयुक्त वा अधिकारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्तांनी नमूद केले.
चहल यांनी एच पूर्व विभागातील वांद्रे - कुर्ला संकुल परिसरातील संरक्षक भिंत, पदपथ; एच पश्चिम विभागातील खार पश्चिम येथे विष्णूबुवा कदम उद्यानाजवळील नववा रस्ता, हसनाबाद महानगरपालिका शाळेजवळील परिसर, के पश्चिम विभागातील सांताक्रूझ मध्ये मांगेलावाडी, इंदिरानगर परिसरात रस्ते, पदपथ, त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते, गल्लीबोळात जावून स्वच्छता केली. त्यानंतर पश्चिम विभागातील जुहूतारा मार्ग येथील मांगेलावाडी, इंदिरानगर परिसरांमध्ये स्वच्छता मोहिमेत ते सहभागी झाले.