CSMT Station: सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:14 IST2025-02-03T11:13:29+5:302025-02-03T11:14:51+5:30
सीएसएमटी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. या टर्मिनसवर दररोज सुमारे ११.५ लाख प्रवाशांची वर्दळ असते.

CSMT Station: सीएसएमटी स्थानकावर लवकरच येणार १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर
मुंबई : मध्य रेल्वेच्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वर लवकरच १५० हायटेक बॅगेज, तसेच बॉडी स्कॅनिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेने निविदा काढली आहे.
सीएसएमटी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. या टर्मिनसवर दररोज सुमारे ११.५ लाख प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेकदा आरपीएफच्या तुकड्या तैनात असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्थानकावरील मशिन्स बिघडल्याने सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५० मशिनसाठी निविदा काढल्या आहेत. त्यानुसार ७ बॅगेज स्कॅन मशिन आणि १४३ बॉडी स्कॅनिंग मशिन्स खरेदी करण्यात येणार आहेत.
नवीन हायटेक मशिन सीएसएमटी मध्ये लावण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बॅगेज स्कॅनरमध्ये ३२ प्रकारच्या वस्तू ओळखण्याची क्षमता आहे. त्यात रेल्वे प्रवासात अतिधोकादायक ठरणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवाशांकडे भरपूर सामान असते. त्यात अनेक धोकादायक वस्तू असू शकतात. त्यामुळे अशा प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवेशावर निर्बंध नाहीत
सीएसएमटी स्थानकात प्रवेश करण्यासाठी १०० पेक्षा जास्त एंट्री पॉइंट आहेत. यामुळे, प्रवाशांच्या हालचालींवर बंधने घालता येत नाहीत, परंतु मशिनद्वारे त्यांच्यावर निश्चितपणे लक्ष ठेवले जाऊ शकते. सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबरच यंत्रांच्या मदतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले.
सीएसएमटीवरील दैनंदिन प्रवासी - सुमारे ११.५ लाख
दररोज धावणाऱ्या एक्स्प्रेस - सुमारे २००
दररोज धावणाऱ्या लोकल ट्रेन - सुमारे १२००
मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एकूण लोकल - १८१०
मध्य रेल्वेची प्रवासी संख्या - सुमारे ७७ लाख
प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी हाय एंड मशिन्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. लगेज स्कॅनिंग मशिन ३२ वेगवेगळ्या वस्तू ओळखण्यास सक्षम असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. हाही त्याचाच एक भाग आहे. - स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे