Join us

कल्याण-डोंबिवलीत १५० जणांना सुरक्षितस्थळी हलवले

By admin | Published: July 30, 2014 11:40 PM

चार दिवसांच्या संततधार पावसानंतर बुधवारी सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली.

१.  चार दिवसांच्या संततधार पावसानंतर बुधवारी सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. रात्रीच्या पावसाने कल्याणच्या सखल भागात पाणी शिरल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आपत्ती निवारण केंद्राने सुमारे दीडशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. या सर्वांना कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या समाज कल्याण केंद्रात हलवण्यात आले. त्यांना अन्नपाकिटेही पुरवण्यात आल्याची माहिती आपत्तीकालीन केंद्राचे व जनसंपर्क विभागाचे अधिकारी प्रकाश ढोले यांनी दिली. २. रात्रभर पाऊस सुरू होता. गेल्या २४ तासांत २१६.१२ मिमी पाऊस झाला असून एकूण पाऊस १२०८ मिमी झाला आहे. या मोसमातील कल्याणात झालेला पाऊस सर्वात अधिक आहे. पावसामुळे पालिका क्षेत्रातील टिटवाळा, शहाड स्मशानभूमी, के.सी. गांधी विद्यालय, योगीधाम नाला, गोविंदवाडी, अशोकनगर, शिवाजीनगर येथे पाणी साचले. भवानीनगर भागात रात्री पाणी साचल्याने ५० लोकांनी स्वत:हूनच स्थलांतर केले. अशोकनगर, शिवाजीनगर भागातील नागरिकांना कल्याण अग्निशमन दल व आपत्कालीन पथकातील नागरिकांनी रात्रीच बाहेर काढले.३. कल्याण पश्चिमेला खाडीकिनाऱ्याच्या गोविंदवाडी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागात म्हशीचे तबेले मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथील नागरिकांची मोठीच तारांबळ उडाली. शहाड पुलाखालून जोरात पाणी वाहत असल्याने त्या भागातील नागरिकांनी तिकडे जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.