रस्त्यावर थुंकल्यास १५० रुपये दंड, कचरा टाकल्यास १८० रुपयांची पावती फाटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 06:32 PM2018-09-07T18:32:22+5:302018-09-07T18:36:41+5:30
वाट्टेल तिथे कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या, उघड्यावर शौच करणाऱ्यांकडून जागेवरच दंडवसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबईः स्वच्छतेतून समृद्धीकडे जाण्याच्या दृष्टीने राज्यातील अ, ब, क आणि ड वर्ग महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात आजपासून नवे नियम लागू झाले आहेत. वाट्टेल तिथे कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या, उघड्यावर शौच करणाऱ्यांकडून जागेवरच दंडवसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
रस्त्यावर कचरा टाकल्यास १८० रुपये दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये मोजावे लागणार आहेत. उघड्यावर शौच करणाऱ्यांकडून ५०० रुपये वसूल केले जातील, असे आदेश नगरविकास विभागाने शुक्रवारी दिलेत.
दंड आकारणीचे अधिकार महापालिका आणि नगरपालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. व्यक्ती आणि संस्था अशा दोन्हींना दंड करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १५ नुसार महापालिका, नगरपालिकांनी उपविधी तयार करून स्वच्छतेबाबतच्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना दंड करणे आवश्यक आहे. हा नियम अमलात येऊन दोन वर्षे उलटली तरी बहुतांश महापालिका, नगरपालिकांनी नियम तयार न केल्याने आता दंड आकारणीचे आदेश थेट नगरविकास विभागानेच काढले आहेत.
महानगरपालिका क्षेत्र
रस्त्यावर घाण करणेः दंड १८० रुपये (अ व बर्ग), १५० रुपये (क व ड वर्ग)
सार्वजनिक ठिकाणी थुंकणेः दंड १५० रुपये (अ व ब वर्ग), १०० रुपये (क व ड वर्ग)
उघड्यावर लघवी करणेः दंड २०० रुपये (अ व ब वर्ग), १०० रुपये (क व ड वर्ग)
उघड्यावर शौच करणेः दंड ५०० रुपये (अ व ब वर्ग), ५०० रुपये (क व ड वर्ग)
नगरपालिका क्षेत्र