मुंबई : श्रीलंकेतील कोलंबो मध्ये 150 पेक्षा जास्त भारतीय नाविक अडकले असून मुंबईत येणारे जहाज व विमान रद्द झाल्याने त्यांचा परतीचा प्रवास बंद झाला आहे. एका प्रवासी जहाजावर कार्यरत असलेले हे 150 नाविक जहाजाद्वारे मुंबई बंदरात येणार होते मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांचे जहाज मुंबईला येऊ शकले नाही. त्यामुळे ते जहाज कोलंबो बंदरात थांबले. त्यानंतर या नाविकांना मुंबईत येण्यासाठी विमान उड्डाणाची तयारी करण्यात आली होती. मात्र या नाविकांच्या दुर्दैवाने त्यांना मुंबई घेऊन येणारे हे विमान देखील काही कारणाने रद्द झाले. त्यामुऴे हे नाविक कोलंबोमध्ये अडकले असून मुंबईत मायदेशी परतण्यासाठी भारत सरकारने काही ठोस उपाययोजना आखावी अशी मागणी या प्रवाशांमधून, केली जात असल्याची माहिती या प्रवाशांची कोलंबो मधून सुटका व्हावी व भारतात येण्यासाठी प्रयत्न करणारे वॉचडॉग फाऊंडेशनचे अँड गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.
केंद्र सरकार व श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने या नाविकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने व सहानुभूतीने पाहावे व त्यांना मुंबईत सुरक्षितरित्या आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पिमेंटा यांनी केली आहे. हे नाविक काम संपल्यानंतर मार्च महिन्यापासून समुद्रात जहाजावर अडकलेले आहेत त्यांना जहाजात स्वतंत्र ठेवण्यात आले असून त्यांना टीव्ही, वायफाय सुविधा देण्यात आली आहे मात्र त्यांना एकमेकांना भेटण्यास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे परिणामी त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. सरकारने त्वरित पावले उचलून या नाविकांना घरी पोचवण्यामध्ये सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे.