मुंबई : केवळ मराठीतून शिक्षण घेतले म्हणून मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये अडवणूक झालेल्या १५० शिक्षकांच्या नियुक्त्या आंदोलनाच्या तब्बल १३० दिवसांनंतरही वाऱ्यावरच आहेत. पालिका शिक्षण विभाग आणि शासन यांची या प्रश्नावरून केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. सोमवारी आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चालाही पोलीस परवानगी नाकारण्यात आल्याने आपण पुन्हा मूक मोर्चा काढून सरकार आणि शिक्षण विभागाचा निषेध करणार असल्याचा इशारा उमेदवारांनी दिला.सोमवारी पालिका सहशिक्षण आयुक्तांनी या उमेदवारांना भेट देऊन आपण सरकारकडून पुढील कार्यवाहीच्या सूचना आल्याशिवाय काही करू शकत नसल्याची प्रतिक्रिया दिली. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठीतून शिक्षण घेतलेल्या या मराठी उमेदवारांच्या इंग्रजी शाळांतील नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याच्या उत्तरादाखल पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे ऑनलाइन शिक्षक भरतीप्रक्रियेत नियुक्ती मिळालेल्या १५० उमेदवारांनी इंग्रजीतून शिक्षणाची अर्हता पूर्ण केली नसल्याने त्यांना नियुक्ती देण्यात आली नसल्याचे मुंबई पालिका शिक्षण विभागाकडून कळविण्यात आल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या उमेदवारांची इंग्रजी अध्यापन कौशल्ये तपासण्यासाठी चाचणी घेऊन, मुंबई पब्लिक स्कूलच्या सुयोग्य उमेदवार निवडीसाठी कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी उत्तरात कळविले आहे. शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीला ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी चर्चेसाठी बोलविण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून ६० टक्के अनुदान वाढीशिवाय इतर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी दिली. त्यामुळे पुढील बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रशिक्षित मुलांना फक्त मराठी माध्यमात शिकले म्हणून नोकरीत नाकारून शासन व सरकार आपले अज्ञान दाखवत आहे. या मुलांची रीतसर निवड झाली असताना या मुलांना विरोध कोणाचा हे कळणे गरजेचे आहे. - सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ