पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राकडून १५ हजार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:05 AM2021-06-21T04:05:17+5:302021-06-21T04:05:17+5:30

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारने ...

15,000 crore from the Center for the development of animal husbandry and dairy business | पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राकडून १५ हजार कोटींचा निधी

पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राकडून १५ हजार कोटींचा निधी

Next

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी केले आहे.

पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य सरकारला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना जाहीर केली आहे. केंद्राने गेल्यावर्षी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेला मंजुरी दिली. मात्र, या योजनेतील १५ हजार कोटींची निधी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आला आहे. या विविध योजनांतर्गत आइस्क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायजेशन, दूध पावडर, इत्यादी दूध प्रक्रिया उद्योग, मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग, व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये ३ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

विविध उद्योग व्यवसायांसोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचा समावेश आहे. या योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, स्थापन झालेली कंपनी यांना लाभ घेता येणार असल्याचे केदार यांनी सांगितले. या योजनेची अधिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन http://dahd.nic.in/ahdf येथे उपलब्ध आहे. या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या व डेअरी विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

............................................................

Web Title: 15,000 crore from the Center for the development of animal husbandry and dairy business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.