Join us

२५ विमा कंपन्यांनी १५,००० कोटी बुडवले; एजंट-विमा अधिकाऱ्यांचे संगनमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 8:29 AM

देशातील २५ विमा कंपन्या व २५० व्यावसायिकांची चौकशी येत्या काही दिवसांत होणार असल्याचे समजते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील विविध विमा कंपन्यांतर्फे त्यांच्या एजंटना देण्यात येणाऱ्या कमिशनमधून तब्बल १५ हजार कोटी रुपयांची करचोरी झाल्याचा आयकर विभागाला संशय असून, त्या अनुषंगाने आता विभागाने चौकशी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, देशातील २५ विमा कंपन्या व २५० व्यावसायिकांची चौकशी येत्या काही दिवसांत होणार असल्याचे समजते. 

विमा योजनेची विक्री केल्यानंतर एजंटला त्याद्वारे कमिशन मिळत असते. मोठ्या रकमेच्या योजनांमध्ये मोठ्या रकमेचे कमिशन मिळते. मात्र, यात एजंट आणि कंपन्यांचे अधिकारी यांचे संगनमत असल्याचा विभागाला संशय आहे. प्रत्यक्षात जास्त कमिशन देऊनही त्याची कागदोपत्री कमी कर आकारणी होईल, अशा पद्धतीने व्यवहार केल्याचा संशय आहे. 

आयकर निरीक्षक आता या प्रकरणाची चौकशी करून नेमकी किती करचोरी झाली आहे व किती करदायित्व आहे, याची पडताळणी करून यापुढे करवसुलीच्या नोटिसा जारी करतील. आयकर विभागासोबतच जीएसटी विभागाच्या गुप्तचर विभागाकडूनही याप्रकरणी चौकशी होणार असल्याचे समजते.

जीएसटीसाठीही दावा ३० कंपन्यांना नोटिसा

एकीकडे आयकर चोरी आणि दुसरीकडे या बनावट पावत्यांच्या माध्यमातून जीएसटी विभागाकडे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून देखील पैसे उकळले गेल्याच्या संशयावरून ही चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी जीएसटी गुप्तचर विभागाने आतापर्यंत ३० कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या.

 

टॅग्स :धोकेबाजी