मुंबई पोलिसांना बंदोबस्ताचा टास्क, १५ हजार फौजफाटा सज्ज
By मनीषा म्हात्रे | Published: October 23, 2023 08:58 PM2023-10-23T20:58:26+5:302023-10-23T20:59:02+5:30
दसरा मेळाव्यासह देवी विसर्जन आणि विश्वचषक सामन्यांसाठी पोलीस तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दसरा मेळाव्याला दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शिवाजी पार्क, आझाद मैदान येथील दसरा मेळाव्यासह देवी विसर्जन व विशवचषक सामन्यासाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आझाद मैदान येथे दसरा मेळावा घेत आहे तर, ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथे होणार आहे. दोन्ही गट यावेळी शक्ती प्रदर्शन करणार असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गट आणि आणि गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्याच दिवशी देवींची विसर्जन मिरवणूक देखील असणार आहे. दुसरीकडे मुंबईत दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्यात विश्वचषक सामना देखील होणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणांवरही बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी ६ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी, १२ हजार ४४९ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणांवर राज्य राखीव पोलीस दलाच्या ३३ प्लाटून, शीघ्र कृती दल व गृहरक्षक दल तैनात करण्यात येणार आहेत.
शिवाजी पार्कसाठी १०० अधिकारी, ६०० अंमलदार
शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी मध्य प्रादेशिक परिमंडळातील पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. १०० अधिकारी, ६०० अंमलदार व राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ प्लाटून शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय आझाद मैदान येथे दक्षिण प्रादेशिक परिमंडळाचे अधिकारी तैनात असणार आहे. याशिवाय मरिन ड्राईव्ह परिसरातही दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. याशिवाय दोन्ही ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथकेही तैनात करण्यात आले आहे.