राजकारणाने काळवंडला मुंबई पालिकेचा १५०वा वर्धापन दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 05:59 AM2023-09-05T05:59:32+5:302023-09-05T05:59:40+5:30
दिनांक ४ सप्टेंबर १८७३ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाची पहिली सभा संपन्न झाली तो महापालिकेचा स्थापना दिवस.
रविकिरण देशमुख
मुंबई : दिनांक ४ सप्टेंबर १८७३ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाची पहिली सभा संपन्न झाली तो महापालिकेचा स्थापना दिवस. साेमवारी त्याला दीडशे वर्षे पूर्ण झाली. जागतिक नकाशावर आगळेवेगळे स्थान असलेल्या आणि देदीप्यमान इतिहास असलेल्या महानगराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या महापालिकेचा दीडशेवा वर्धापन दिन असतानाही ना कसला समारंभ झाला, ना पालिकेच्या दारावर तोरण लागले, ना एखादा दीप प्रज्वलित झाला. मुंबई महानगरपालिका या एका अग्रगण्य संस्थेचा गौरवशाली दिन सध्याच्या राजकीय वातावरणामुळे आणि पालिका प्रशासनावरील कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे अत्यंत सुतकी वातावरणात पार पडला.
पालिकेची स्थापना १८७२ मध्ये झाली; पण, नेमका दिवस उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेची पहिली सभा ज्या दिवशी पार पडली तोच दिवस स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस महापालिकेने अतिशय भव्य स्तरावर साजरा करायला हवा. पण, तो साजरा करण्यात ना कुणाला रस, ना कुणाला उत्साह! या उदासीनतेचा मागोवा घेतला तर असे ऐकण्यात आले की, सध्या महापालिका सभागृह अस्तित्वात नाही, पालिकेवर प्रशासक आहेत. प्रशासन कमालीच्या दडपणाखाली आहे. कोविड घोटाळ्यात अनेक नावे गुंतली. अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
पालिकेत आज राजकीय नेतृत्व अस्तित्वात नाही. प्रशासनाने कार्यक्रम आयोजित करावा अन् अधिकाऱ्यांना अटक झाली तर दीडशे वर्ष साजरे करण्याचा कार्यक्रम काळवंडून जाईल, या भीतीपोटी काेणी कार्यक्रम आयोजित करण्याच्या फंदात पडले नाही, अशी चर्चा पालिकेत होती. मुंबई पालिकेवर अशी वेळ येणे केवळ दुर्दैवी असल्याचे सांगून एक निवृत्त अधिकारी म्हणाले की, ज्या शहराने देशाला अनेक नामवंत नेते दिले, कठोर आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासक दिले, ज्यांचे दाखले आज उत्तम कामांसाठी दिले जातात, त्यांना स्वतःचा दीडशेवा वर्धापन दिन साजरा करता न येणे यासारखे दुर्दैव नाही.
कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविलेच असते तर नेमके कोणाला निमंत्रित करावे हाही एक मोठा विषय होता. याचे कारण आज नेत्यांची तोंडे दाहीदिशांना आहेत. पालिकेचा कार्यक्रम हा केवळ सत्ताधारी पक्षाचा असू शकत नाही; कारण ही लोकांची संस्था आहे. तिथे सर्वपक्षीय नेत्यांना सध्याच्या कडवट आणि विषारी वातावरणात बोलवावे तरी कसे, असा प्रश्न बहुधा अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आणि नको तो वाद या भावनेने कार्यक्रम आयोजित करण्याच्या फंदात कोणी पडले नाही, असे एक जाणकार अधिकारी म्हणाले.