दुसऱ्या लाटेचा फटका; एप्रिलमध्ये ६४, तर मे महिन्यात ५६ जणांचा बळी
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी त्याचा मोठा फटका नागरिकांप्रमाणेच पोलिसांनाही बसला. मागील ५ महिन्यांत तब्बल १५२ खाकी वर्दीवाल्यांना काेराेनामुळे जीव गमवावा लागला. सरत्या मे महिन्यात ५६ तर एप्रिलमध्ये सर्वाधिक ६४ जणांचा मृत्यू झाला.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस नाकाबंदी लावून गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांनाही या संसर्गाची लागण होत आहे. गेल्यावर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून आजअखेर राज्यातील तब्बल ४७० पोलीस अधिकारी, अंमलदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात ४२ अधिकारी, तर ४२८ अंमलदारांचा समावेश आहे.
गेल्यावर्षी मार्च ते ३१ डिसेंबरपर्यंत ३३२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. जानेवारी २०२१पासून २ जूनपर्यंत १५२ पोलिसांचा बळी या विषाणूने घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचे प्रमाण कमी होते. अगदी दि. १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २६ जण बळी पडले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला, तर जूनच्या दाेन दिवसात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईसह विविध पोलीस घटकांतील ही संख्या आहे.
* या वर्षात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले पोलीस
महिना - मृत्यू
जानेवारी - १२
फेब्रुवारी - २
मार्च - १३
एप्रिल - ६४
मे - ५६
२ जून - १
* दोन लाटेत मिळून ४४ हजार पोलिसांना लागण
कोरोनाच्या दोन लाटेत पोलीस दलात आतापर्यंत तब्बल ४३ हजार ९१६ जणांना लागण झाली आहे. त्यात ५,३०४ अधिकारी व ३८,६१२ अंमलदारांचा समावेश आहे. सध्या १,१९४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या ७ दिवसात ३२९ पोलिसांना काेराेनाची लागण झाली आहे.
.........................................