Join us  

लोकलसाठीची १५३ डब्यांची खरेदी रखडली

By admin | Published: March 04, 2016 3:16 AM

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयांच्या तुलनेत डॉलर आणखी महागल्याने कर्जाच्या रकमेत २00 कोटी रुपये एवढी अतिरिक्त रक्कम जमा झाली आणि याच रक्कमेतून एमआरव्हीसीने

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयांच्या तुलनेत डॉलर आणखी महागल्याने कर्जाच्या रकमेत २00 कोटी रुपये एवढी अतिरिक्त रक्कम जमा झाली आणि याच रक्कमेतून एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) लोकलचे १५३ डबे विकत घेण्याची योजना आखली होती. मात्र, रेल्वे बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेचा एमआरव्हीसीला चांगलाच फटका बसला आहे. एमआरव्हीसीला प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून मिळालेल्या कर्जातील ही अतिरिक्त २00 कोटी रुपये रक्कम बँकेला परत करण्याची भूमिका घेतली आहे. एमआरव्हीसीच्या एमयूटीपी अंतर्गत असणाऱ्या रेल्वे प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडूनही कर्जपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर, या प्रकल्पांसाठी रेल्वे आणि राज्य शासनाकडूनही ५0:५0 टक्के निधी उपलब्ध केला जात आहे. एमआरव्हीसीला जागतिक बँकेने २0१0 मध्ये ४३0 दशलक्ष डॉलर (१,९१0 कोटी रुपये) मंजूर केले. त्या वेळी डॉलरचा दर ४४.४ रुपये एवढा होता. मात्र, दरांमधील बदलांचा अंदाज घेतल्यानंतर एमआरव्हीसीने ३८५ दशलक्ष डॉलर म्हणजेच, १ हजार ७0९ कोटी रुपये कर्ज घेतले. यातील आतापर्यंत ६५ दशलक्ष डॉलर एवढी रक्कम एमआरव्हीसीला वळती करण्यात आली, तर एमआरव्हीसीला ३२0 दशलक्ष डॉलर एवढी रक्कम मिळणे बाकी आहे. त्यानंतर जून २0१३ मध्ये डॉलरचा भाव वधारल्याने ५९ रुपये दरानुसार रक्कम १,८८८ कोटी इतकी झाली. आता डॉलरचा भाव ६७ रुपये असल्याने हीच रक्कम २ हजार १४४ कोटी रुपये एवढी झाली. त्यातून ३0 दशलक्ष डॉलर म्हणजेच २00 कोटी रुपये रक्कम अतिरिक्त जमा झाली. कर्जातून उपलब्ध झालेल्या अतिरिक्त रकमेतून मुंबईतील लोकलसाठी १५३ डबे विकत घेतले जाणार होते. त्याला मंजुरी न देता, रेल्वे बोर्डाने ही रक्कम बँकेला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)