सरकार पूरग्रस्तांच्या पाठिशी, कोल्हापूर अन् सांगलीतील पीडितांसाठी 154 कोटी दिले  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 10:20 AM2019-08-10T10:20:20+5:302019-08-10T10:20:36+5:30

पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

154 crore aid to the victims in Kolhapur and Sangli by government, cm devendra fadanvis | सरकार पूरग्रस्तांच्या पाठिशी, कोल्हापूर अन् सांगलीतील पीडितांसाठी 154 कोटी दिले  

सरकार पूरग्रस्तांच्या पाठिशी, कोल्हापूर अन् सांगलीतील पीडितांसाठी 154 कोटी दिले  

googlenewsNext
ठळक मुद्देपूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

मुंबई - पूरग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडून देण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत ट्विट करत माहिती दिली.  

पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असेही अजोय मेहता यांनी सांगितले. 

मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  :

· महाराष्ट्रात जून ते 9 ऑगस्टपर्यंत 782 मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या 109 टक्के पाऊस झाला. मागीलवर्षी या काळात 80 टक्के पाऊस झाला होता.
· 4 ऑगस्टपासून कोल्हापूर येथे सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला. सांगलीमध्ये सरासरीच्या 223 टक्के पाऊस पडला आणि साताऱ्यात सरासरीच्या 181 टक्के पाऊस झाला.
· अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 8 आणि सांगली जिल्ह्यात 4 असे एकूण 12 तालुके बाधित झाले.
· कोल्हापूरमध्ये 239 गावे, सांगलीत 90 गावे अशी 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.
· या बाधित गावांमध्ये आतापर्यंत प्रशासन, लष्कर, नौदल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या मदतीने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
· या सर्व व्यक्तींसाठी मदत निवारे उभारले आहेत. तेथे त्यांना वास्तव्यास ठेवण्यात आले आहे.
· राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे की, या निवाऱ्यांच्या बांधकामांचा, तेथील नागरीकांच्या जेवणाचा तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना कपडे पुरविल्यास त्याचा खर्च आणि औषधांचा खर्च शासन देणार आहे. निवाऱ्यातील नागरीकांसाठी अन्य बाबींसाठी खर्च करावा लागला तर त्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
· एनडीआरएफची एकूण 31 पथके (एका पथकात 40 जणांचा समावेश) कार्यरत असून त्यातील 16 पथके सांगलीमध्ये, 6 कोल्हापूरमध्ये, बाकी पथके आवश्यकता भासल्यास कार्यरत ठेवण्यात येत आहेत.
· पूरग्रस्त भागात जे नागरीक स्थलांतर करु इच्छित नव्हते त्यांना प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 किलो तांदुळ आणि गहू वाटप करण्यात येत आहे.
· सर्व पूरग्रस्त भागातील आपत्तीग्रस्त नागरीकांना प्रति कुटुंब दहा हजार रुपये तर शहरी भागातील नागरीकांना 15 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नागरीकांना ही मदत देण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही.
· आरोग्य विभागामार्फत 70 वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि 2 ते 3 नर्स यांचा समावेश आहे.· वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. 32 पथके कोल्हापूर येथे तर 8 पथके सांगलीमध्ये तैनात केली आहेत. एका पथकात 4 लाईनमन आणि कर्मचारी उपलब्ध आहेत. पाणी कमी झाल्यावर त्यांच्यामार्फत पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
· ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाले असतील तर त्याच्या दुरुस्तीची वाट न पाहता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा. मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर कोल्हापूर आणि सांगली येथे पाठविण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजनांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये यांना वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
 

Web Title: 154 crore aid to the victims in Kolhapur and Sangli by government, cm devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.