मुंबई : जगभरात कोरोनाच्या लाटेमुळे व्यापार साखळी विस्कळीत झाली असताना ‘सीप्झ’ने मात्र गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) १ लाख ५४ हजार ३२८ कोटींची निर्यात करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याशिवाय ८० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ५ लाख ६० हजार लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्यात यश मिळाल्याची माहिती ‘सीप्झ-सेझ’चे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन यांनी दिली.
सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनच्या (सीप्झ) सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन शनिवारी त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीप्झचे माजी विकास आयुक्त आर. प्रेमकुमार, बी. एन. मखेजा, औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आमगोठू श्री रंगा नाईक उपस्थित होते. सीप्झचे पहिले विकास आयुक्त (माजी आयएएस) एस. राजगोपाल यांनी दूरचित्रसंवाद माध्यमातून कार्यक्रमाला हजेरी लावत या औद्योगिक क्षेत्राच्या स्थापनेचा इतिहास उलगडून दाखवला.
जगन्नाथन म्हणाले, गेल्या काही वर्षांत सीप्झच्या कामगिरीत सातत्यपूर्ण वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये ६९४ कंपन्यांसह या संपूर्ण क्षेत्राची एकूण निर्यात १ लाख ५४ हजार ३२८ कोटी रुपये नोंदविण्यात आली. सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना यशाचे शिखर गाठता आल्याने अत्यानंद होत आहे. आगामी वर्षभर हा उत्सव साजरा केला जाणार असून, सांस्कृतिक रजनी, नृत्य आणि नाटक, पुरस्कार सोहळे, रक्तदान शिबिरे, मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन, क्रिकेट स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम हाती घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेत ‘सीप्झ’मधील दागिन्यांचा सर्वाधिक वापर
१ मे १९७३ रोजी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकल उत्पादन निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणून या औद्योगिक क्षेत्राची स्थापना करण्यात आली. १९८७-८८मध्ये रत्ने आणि दागिने उत्पादकांना त्यात सामावून घेण्यात आले. सन २०००मध्ये भारतातील पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्रांपैकी एक, तर डिसेंबर २०१९मध्ये ‘बहु-क्षेत्रीय सेझ’ म्हणून घोषित करण्यात आले.
सीप्झमध्ये १८०हून अधिक दागिन्यांचे कारखाने आहेत. परदेशात येथील दागिने ‘सीप्झ ज्वेलरी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. जगातील सर्वात मोठा दागिन्यांचा ग्राहक असलेल्या अमेरिकेच्या आयातीमध्ये सीप्झ-सेझचा एक चतुर्थांश वाटा आहे. भारताच्या रत्नजडित दागिन्यांच्या निर्यातीत ५३ टक्के, तर देशातील एकूण दागिन्यांच्या निर्यातीत ३१ टक्के योगदान ‘सीप्झ’चे आहे.
कोरोना काळात २०२१-२२मध्ये सीप्झने ६१ टक्के निर्यातवाढ नोंदवली. सध्या महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवमधील ३७ ‘सेझ’ प्रकल्प सीप्झच्या विकास आयुक्तांच्या अखत्यारित येतात. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारख्या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. इस्रो, चांद्रयान मोहिमेच्या ‘पीसीबी’चे अनेक युनिट्स या सेझमध्ये आहेत, अशी माहिती सहविकास आयुक्त सीपीएस चौहान यांनी दिली.