कांदिवलीतील १५५ नागरिकांना मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:26+5:302021-07-25T04:06:26+5:30
मुंबई : बोगस लसीकरणाचा फटका बसलेल्या कांदिवली पश्चिम येथील हिरानंदानी हेरिटेज या गृहसंकुलातील रहिवाशांचे शनिवारी महापालिकेमार्फत लसीकरण करण्यात आले. ...
मुंबई : बोगस लसीकरणाचा फटका बसलेल्या कांदिवली पश्चिम येथील हिरानंदानी हेरिटेज या गृहसंकुलातील रहिवाशांचे शनिवारी महापालिकेमार्फत लसीकरण करण्यात आले. मात्र यापैकी काही रहिवाशांनी यापूर्वीच लस घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ३९० लाभार्थ्यांपैकी १५५ नागरिकांनी संध्याकाळ पर्यंत लस घेतली.
कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलाने ३० मे रोजी खासगी केंद्रामार्फत लसीकरण करण्यात आले. परंतु, हे लसीकरण बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली. मात्र अशाप्रकारे मुंबईत नऊ ठिकाणी बनावट व लसीकरणाचे प्रकार घडल्याचे उजेडात आले. त्यामुळे येथील ३९० लाभार्थ्यांना सर्वप्रथम लस देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
त्यानुसार कांदिवलीतील महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केट महापालिका लसीकरण केंद्रावर खास सत्र आयोजित करण्यात आले होते. पोलिसांकडून मिळालेल्या यादीनुसार ३९० नागरिकांना लस देण्यात येणार होती. मात्र यापैकी बहुसंख्य रहिवाशांनी आधीच्या बनावट लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने यापूर्वीच लस घेतल्याचे समोर आले. त्यामुळे अद्याप लस न घेतलेले १५५ रहिवाशांचे लसीकरण शनिवारी करण्यात आले.
पडताळणी अंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस देण्यात येणार आहे. कांदिवली मधील रहिवाशांना लस दिल्यानंतर आता उर्वरित आठ ठिकाणी बोगस लसीकरणाचा फटका बसलेल्या नागरिकांना लस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.