घोड्यावर बसून येणारे संपादक आणि वर्तमानपत्र, नाणे पुरण्याच्या घटनेची १५५ वर्षे
By अोंकार करंबेळकर | Published: November 19, 2017 05:25 AM2017-11-19T05:25:06+5:302017-11-19T07:08:53+5:30
राणीचा बाग आणि भाऊ दाजी लाड हे मुंबईकरांच्या मनातले एक समिकरणच आहे. भायखळ्याच्या या दिमाखदार वास्तूच्या पायाभरणीस आज १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. काही वर्षांपुर्वी डागडुजी झाल्यावर या संग्रहालयास नवी झळाळी प्राप्त झाली आहे.
मुंबई : राणीचा बाग आणि भाऊ दाजी लाड हे मुंबईकरांच्या मनातले एक समिकरणच आहे. भायखळ्याच्या या दिमाखदार वास्तूच्या पायाभरणीस आज १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. काही वर्षांपुर्वी डागडुजी झाल्यावर या संग्रहालयास नवी झळाळी प्राप्त झाली आहे. या इमारतीप्रमाणे तिच्या पायाभरणीची कथाही तितकीच रोचक आहे. भाऊ दाजी लाड संग्रहालय मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे.
१८५८ मध्ये भारतात उठाव शांत झाल्यानंतर व्हिक्टोरिया राणीने कंपनीकडून सर्व कारभार आपल्या हातात घेतला. त्या प्रित्यर्थ आणि तिच्या सन्मानासाठी व राजनिष्ठा दाखवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी चर्चा मुंबईत सुरु झाली. तेव्हा टाऊन हॉलमध्ये ( म्हणजे एशियाटिक ग्रंथालयाची वास्तूू) एक बैठक घेण्यात आली. त्यात जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत "व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियम" नावाने एक इमारत बांधण्याचे निश्चित झाले. त्यानुसार एक समितीही स्थापन झाली. नाना शंकरशेट तिचे अध्यक्ष तर भाऊ दाजी लाड व जॉर्ज बर्डवूड तिचे सचिव झाले. नाना शंकरशेट यांनी पहिल्यांदा पाच हजार रुपयांची वर्गणी दिल्यावर सर्व श्रीमंत पारशी, वाणी यांनीही वर्गणी जमा केली, ही सगळी वर्गणी १ लाख १६ हजार इतकी झाली व सरकारच्या वतीने १ लाख रुपये देण्यात आले. या संग्रहालयासाठी झटणारी आणखी एक व्यक्ती होती ती म्हणजे डा बुईस्ट. बॉम्बे टाइम्सचे संपादक असणारे हे बुईस्ट शिवडीच्या किल्ल्यात राहात आणि रोज कुलाब्याला घोड्यावरुन कामासाठी जात. ते मुंबईतील जिओग्राफिकल, अँग्री हाँर्टिकल्चरल सोसायटी, वेधशाळा, बोटॅनिकल गार्डन अशा संस्थांशी संबंधित होते. मुंबईत एक वस्तूसंग्रहालय असावे अशी त्यांचीच कल्पना होती.
ठरावानुसार १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळ्यात आजच्या भाऊ दाजी लाड इमारतीसमोरील पटांगणात कार्यक्रम करण्यात आला. गव्हर्नर बार्टल फ्रियर दाम्पत्य, नाना शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते. पायाभरणीच्या दगडाखाली एक तांब्याची पेटी पुरण्यात आली. या पेटीमध्ये त्या दिवशी मुंबईत प्रसिदध झालेल्या सर्व वर्तमानपत्रांची एक प्रत, एक नाणे, टाऊन हॉल बैठकीतील ठराव व इतर कागदपत्रे आणि मदत करणार्या दात्यांची यादी ठेवण्यात आली. याबाबत गोविंद माडगावकर यांनी मुंबईचे वर्णन पुस्तकात सविस्तर लिहून ठेवले आहे. त्यानंतर लेडी फ्रियर यांच्या हस्ते व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच राणीच्या बागेचा मुहूर्त केला गेला.
१८७२ साली ही इमारत पूर्ण होऊन लोकांसाठी खुली करण्यात आली. १ नोव्हेंबर १९७५ रोजी या संग्रहालयाचे नाव भाऊ दाजी लाड असे करण्यात आले. याच्या आत ठेवलेल्या वस्तूंप्रमाणेच ही इमारतही पाहण्यासारखी आहे. तिचे वर्णन करताना बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे लिहितात, " ह्या इमारतीची लांबी १८० व रुंदी ८० फूट आहे. ह्या म्यूझिअमांत नोबलकृत प्रिन्स कॉन्सर्ट यांचा पुतळा आहे. ही इमारत एकमजली आहे. आंत सर्व प्रकारचे पदार्थ ठेविले आहेत. मधून मधून इमारतीच्या खांबास सोनेरी मुलामा दिला आहे."
राणीच्या बागेत मुंबईचे महापौर राहायला येणार का? पेग्विंन अशा मुद्द्यांबरोबर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे शहराच्या इतिहासातील स्थान याबाबत अधूनमधून विचार व्हायला हरकत नाही.
( द इलस्ट्रेटेड लंडन न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त.)
संदर्भ आणि अधिक वाचनासाठी-
१) मुंबईचे वर्णन- गोविंद नारायण माडगावकर, समन्वय प्रकाशन
२) स्थल-काल - अरुण टिकेकर, मौज प्रकाशन
फोटो सौजन्य- भाऊ दाजी लाड म्यूझियम, कुणाल त्रिपाठी.