१५६३ विद्यार्थ्यांची २३ जूनला पुन्हा परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
By रेश्मा शिवडेकर | Published: June 13, 2024 10:32 PM2024-06-13T22:32:55+5:302024-06-13T22:33:16+5:30
दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत ही परीक्षा होईल. या विद्यार्थ्यांचा निकाल लगेचच म्हणजे ३०जूनला जाहीर होईल. या विद्यार्थ्यांची आताची गुणपत्रिका रद्द होईल.
मुंबई- नीट-युजीमध्ये नियमापेक्षा कमी वेळ दिला गेल्याने नुकसान झालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २३ जूनला होणार आहे. वेळेचे नुकसान झालेल्या या विद्यार्थ्यांची ग्रेसमार्क देऊन भरपाई करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ग्रेसमार्क देण्याचा निर्णय रद्द करून नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, असे आदेश गुरूवारी दिले. त्यानुसार नीट-युजीने आयोजन करणाऱया नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) या विद्यार्थ्यांकरिता २३ जूनला फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे.
दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत ही परीक्षा होईल. या विद्यार्थ्यांचा निकाल लगेचच म्हणजे ३०जूनला जाहीर होईल. या विद्यार्थ्यांची आताची गुणपत्रिका रद्द होईल. त्याऐवजी ग्रेसमार्क वगळून सुधारित गुणपत्रिका दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसायचे नाही, त्यांची ही सुधारित गुणपत्रिका प्रवेशाकरिता ग्राह्य धरली जाईल.
परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश पत्र दिले जाईल.