लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडच्या रुग्णसंख्येत दररोज २० टक्क्यांनी वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयातील खाटा देखील महापालिका ताब्यात घेणार आहे. त्यानुसार मुंबईतील १५७ खासगी रुग्णालय - नर्सिंग होम मधील ८० टक्के खाटा व अतिदक्षता विभागातील शंभर टक्के खाटा तयार ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी पालिकेचे पथक ११ जानेवारीपासून पाहणी करणार आहे.
मुंबईत डिसेंबर २०२१ पासून बाधित रुग्ण वाढू लागले. मागील तीन दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. यापैकी ९० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, तरी पाच टक्के बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील रुग्णवाढ उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पालिका रुग्णालय, जम्बो कोविड केंद्रामध्ये खाटांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी पालिकेने खासगी रुग्णालयातील खाटा आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानुसार पुन्हा खासगी रुग्णालयांना ८० टक्के खाटा कोविड बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीnकोरोना रुग्णांसाठी ८० टक्के खाटा १० जानेवारीपर्यंत सज्ज ठेवा. खाटांची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर जाहीर करावी.nपालिका वॉर्ड वॉर रूमशी समन्वय साधूनच रुग्णाला दाखल करावे. थेट भरती करू नये. लक्षणे, सहव्याधी नसल्यास तीन दिवसांनी बाधित रुग्णाला डिस्चार्ज द्यावा.nरुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग, औषधांचा साठा, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट आदींचा साठा असावा.nतयार ठेवलेल्या खाटा बाबत पालिका मुख्यालय नियंत्रण कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांना माहिती द्यावी. पालिकेचा आदेश मोडल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई होणार आहे. nया खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सरकारी दरानेच शुल्क आकारले जातील. याची तपासणी पालिका लेखा परीक्षकांकडून होणार आहे.
खासगी रुग्णालयांद्वारे ७४१० खाटांची व्यवस्था...
मुंबईतील १५७ खासगी रुग्णालये, नर्सिंग होम मधील ८०% खाटा महापालिका ताब्यात घेत आहे. या माध्यमातून कोविड बाधित रुग्णांसाठी ७४१० खाटा उपलब्ध होणार आहेेत.