राज्यात कोरोनाचे १५,८१७ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:09 AM2021-03-13T04:09:56+5:302021-03-13T04:09:56+5:30
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी राज्यात कोरोनाचे १५,८१७ नवीन रुग्ण सापडले, तर ११,३४४ रुग्ण ...
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी राज्यात कोरोनाचे १५,८१७ नवीन रुग्ण सापडले, तर ११,३४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
सुरळीत झालेले दैनंदिन व्यवहार आणि कोरोनाच्या नियमांच्या पालनात आलेली शिथिलता यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. शुक्रवारी नवीन वर्षातील, एका दिवसातील मोठी वाढ नोंदली गेली. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी यापूर्वीच कडक निर्बंध लागू केले असून राज्य स्तरावरील निर्बंधांबाबत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
शुक्रवारी राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात (१८४५) सापडले. त्यापाठोपाठ नागपूर (१७२९), मुंबई (१६४६), पिंपरी-चिंचवड (८४१), नाशिक (७१५), जळगाव ग्रामीण (६८८), औरंगाबाद (६०९), यवतमाळ (४५५), कल्याण-डोंबिवली (४२८) या भागात मोठ्या संख्येने नवीन रुग्ण सापडले आहेत.
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आता १ लाख १० हजार ४८५ झाली आहे, तर दिवसभरात एकूण ५६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतही वाढते रुग्ण
मुंबईत दिवसभरात १,६४६ रुग्ण सापडले, तर चार जणांचा मृत्यू झाला. एकूण १,१२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर आता १९६ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईतही दिवसेंदिवस चिंतेचे मळभ अधिक गडद होत आहे.