मुंबई : मेट्रो प्रकल्प व अन्य विकासकामांच्या मार्गात अडथळा ठरलेल्या १५९ झाडांची कत्तल करण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही झाडे प्रकल्पासाठी तोडण्यात आली तरी १०७ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत.मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झाडे तोडण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे मेट्रो प्रकल्पाशी संबंधित झाडे तोडण्याचे प्रस्ताव रेंगाळले होते. काही महिन्यांपूर्वी आरे कॉलनीतील वृक्षतोडीचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. त्या वेळेस वृक्षांची कत्तल यापुढे होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी १५९ झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मेट्रो प्रकल्प २ व ७ च्या कामासाठी १५९ झाडे तोडण्याची, तर १०७ झाडे पुनर्रोपित करण्याची मंजुरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. मात्र मेट्रो स्टेशनच्या बाजूचे रस्ते आणि नाले आदी कामासाठी ही झाडे तोडणे आवश्यक आहे, आमचा विरोध मेट्रोच्या कामासाठी नव्हे, तर झाडे तोडण्याला आहे. आवश्यक असतील तितकी झाडे वाचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे स्पष्टीकरण स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या वेळी दिले.१०७ झाडांचे होणार पुनर्रोपण१मुंबई मेट्रो आणि इतर शासकीय कामांच्या आड येणारी १५९ झाडे तोडण्यास आणि १०७ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली.२ मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेले रस्ते आणि नाल्याच्या कामासाठी झाडे तोडण्यास संमती देण्यात आल्याचा युक्तिवाद शिवसेना नगरसेवकांनी केला.३ मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे भाजपने या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
मेट्रोसाठी १५९ झाडांची कत्तल, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 2:21 AM