तीन महिन्यांत मुंबईत झाले १५वे अवयवदान
By admin | Published: March 28, 2016 02:49 AM2016-03-28T02:49:01+5:302016-03-28T02:49:01+5:30
वसईत राहणाऱ्या ४३वर्षीय इसमाला डोकेदुखी आणि अन्य त्रास जाणवू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने या पुरुषास ब्रेनहॅमरेज झाले.
मुंबई : वसईत राहणाऱ्या ४३वर्षीय इसमाला डोकेदुखी आणि अन्य त्रास जाणवू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने या पुरुषास ब्रेनहॅमरेज झाले. त्यामुळे २३ मार्चला याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर त्याच्या पत्नीने अवयवदानास संमती दिल्याने तिघांना जीवनदान मिळाले.
४३वर्षीय इसमाला २१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पुरुषाचा रक्तदाब वाढला. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. ब्रेनहॅमरेज झाल्यानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्या वेळी ब्रेनडेड पुरुषाच्या भावाला अवयवदानाविषयी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला विचारले. त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन झाल्यावर त्यांनी अवयवदानाला संमती दिली, असे रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुचेता देसाई यांनी सांगितले.
ब्रेनडेड व्यक्तीच्या मावशीने डॉक्टरांना सांगितले, हा आमचा पवित्र महिना आहे. त्यामुळे त्याचे अवयव दान केल्यास नक्कीच आम्हाला समाधान मिळणार आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. शक्य असणाऱ्या सर्व अवयवांचे दान करण्यास कुटुंबीयांनी संमती दिली होती.
या पुरुषाचे मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत हिंदुजा रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले आहे. तर, एक मूत्रपिंड जसलोक रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले आहे. या रुग्णाचे नातेवाईक हृदय दान करायलाही तयार होते. मात्र, हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्ण प्रतीक्षा यादीत नसल्यामुळे हृदय दान केले नाही, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)