Join us

धक्कादायक! चौदा वर्षांखालील १६ लहानग्यांना एचआयव्हीचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 7:25 AM

कोरोनाकाळात खंड पडलेल्या एचआयव्ही चाचण्यांनी यंदाच्या वर्षभरात वेग धरल्याचे दिसून आले.

मुंबई :

कोरोनाकाळात खंड पडलेल्या एचआयव्ही चाचण्यांनी यंदाच्या वर्षभरात वेग धरल्याचे दिसून आले. मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, शहर उपनगरांत एप्रिल ते ऑक्टोबर या काळात पार पडलेल्या दोन लाख ९८ हजार ५०७ जणांच्या तपासणीत चौदा वर्षांखालील १६ रुग्णांना एचआयव्ही संसर्गाचे निदान झाले आहे.

राज्यात ‘एचआयव्ही’च्या रुग्णांचे संकट ओढवल्यानंतर मातांकडून बाळांना संसर्ग होण्याचा धोका वाढला होता. मात्र, गेल्या बारा वर्षांपूर्वी असलेले प्रमाण १५ टक्क्यांवरून विविध उपायांमुळे आता अवघ्या अडीच टक्क्यांपर्यंत घटले आहे. त्यामुळेच आता मातांकडून बाळांना संसर्गाचा धोका कमी करण्यात राज्य एड्स नियंत्रण संस्थेला यश आले आहे.

२००९ पासून ‘नॅको’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ‘एमसॅक्स’ने राज्यातील गर्भवती महिलांकडून बाळांना ‘एचआयव्ही’ रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. माता बाधित असल्याचे उशिरा निदान झाले, तरी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर सहा आठवडे, सहा महिने, १२ महिने आणि १८ महिने अशा टप्प्याटप्प्याने बाधित बाळाच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातून बाळाच्या शरीरातील एचआय़व्हीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. त्यामुळे मातेकडून बाळाला संसर्ग होण्याचे प्रमाण घटले आहे.

मातेकडून बाळाला संसर्ग होण्याचे २००९ मध्ये १५.४२ टक्के एवढे प्रमाण होते. त्यानंतर हे प्रमाण २०११ ते १२ या वर्षात १६ टक्क्यांवर गेले. त्यानंतर २०१२ ते १३ या वर्षात १५.१५ टक्क्यांवर आले. त्यानंतर २०१३ ते १४मध्ये हे प्रमाण थेट ९.३५ टक्क्यांपर्यंत खाली आले. त्यानंतर हळूहळू हे प्रमाण घटत राहिल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. ऑक्टोबर २०२१पर्यंत अंदाजित हे प्रमाण २.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 

७ महिन्यांतील स्थिती कोरोनाकाळात एचआयव्ही चाचण्यांना काहीसा ब्रेक लागला होता. त्या काळात कोरोना संसर्ग नियंत्रण हेच लक्ष्य होते. त्यामुळे आता कोरोनानंतर एचआयव्ही तपासण्या, निदान व उपचारांची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. मागील सात महिन्यांत करण्यात आलेल्या एचआयव्ही चाचण्यांमध्ये एक हजार ७२० एचआय़व्ही रुग्ण बाधित असल्याचे आढळले आहे, अशी माहिती मुंबई एड्स नियंत्रण संस्थेचे उपसंचालक डॉ. विजयकुमार करंजकर यांनी दिली.

टॅग्स :एड्स