Join us

लालबागमधील सिलेंडर स्फोटात १६ जखमी; ५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 3:58 PM

cylinder blast in Lalbagh : रविवारी सकाळी ७.२३ च्या सुमारास सिलेंडर स्फोट

मुंबई : लालबाग येथील गणेश गल्लीमधील तळमजला अधिक चार मजली साराभाई इमारतीमधील दुस-या मजल्यावर खोली क्रमांक १७ मध्ये रविवारी सकाळी ७.२३ च्या सुमारास झालेल्या सिलेंडर स्फोटात तब्बल १६ जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. १६ जखमींपैकी १२ जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात तर ४ जखमींवर मसिना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १६ जखमींमध्ये ५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींपैकी प्रथमेश मुंगे, रोशन अंधारी, मंगेश राणे, महेश मुंगे, सुशीला बगारे, ज्ञानदेव सांवत हे ७० ते ८० टक्के भाजले असून, यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर विनायक शिंदे, ओम शिंदे, यश राणे, करिम, मिहिर चव्हाण, ममता मुंगे हे ३५ ते ५० टक्के भाजले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मसिना रुग्णालयात दाखल असलेले वैशाली हिंमाशु, त्रिशा, बिपिन, सुर्यकांत हे ७० ते ९५ टक्के भाजले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडर स्फोटात एलपीजी, एलपीजी सिलेंडर, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कपडे, घरातील साहित्य जळाले आहे. याचा फटका खोली क्रमांक १७, १६, १७ अ आणि १५ सह कॉमन पॅसेजला बसला आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की खोली क्रमांक १७, खोली क्रमांक १६ आणि १७ च्या भिंतीसह या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. १६ आणि १७ या घरांची भिंत कोसळली आहे.येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविताना वीज प्रवाह खंडीत करण्यात आला आहे. पोलीस, बेस्ट, इमारती विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी स्थानिकांनी जखमींना खासगी वाहनांच्या मदतीने केईएम रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, दुर्घटना नेमकी कशी घडली. नेमके काय अडथळे आले यासह पुढील प्रक्रियेबाबत महापालिका प्रशासन कार्यरत आहे.

 

टॅग्स :गॅस सिलेंडरमुंबईमुंबई महानगरपालिका