16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; चेंबूर येथील महापालिका शाळेतील घटना; सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 07:59 AM2023-10-14T07:59:21+5:302023-10-14T07:59:47+5:30
या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.
मुंबई : चेंबूरच्या आणिक गाव येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. जेवण केल्यानंतर १६ विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.
हिंदी माध्यमाच्या शाळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून मध्यान्ह भोजन दिले जाते. दररोज सुमारे १८९ विद्यार्थ्यांना या भोजनाचे वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांना वाटाण्याची उसळ आणि भात देण्यात आला होता. या भोजनानंतर तासाभराने सहावी आणि सातवी इयत्तेतील काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, काहींना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच मुलांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेणारे विद्यार्थी एकूण १२ ते १३ वर्षे वयोगटातील आहे.
१६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना काही वेळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या देखील प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जनरल विभागात हलविण्यात आले.
पुरवठादाराविरूद्ध गुन्हा
पुरवठादार तसेच संबंधित जबाबदार व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशा माहिती आरसीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.
शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू
सर्व मुलांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती परिसरात पसरताच पालक – नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतल्याने काहीशी गोंधळाची स्थिती उद्भवली होती.
सर्व शाळांचा पुरवठा थांबविला
शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत महापालिकेच्या २४ शाळांमधील अंदाजे ६७९७ विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करण्यात येतो. आणिकगांव मनपा शालेय इमारतीमधील हिंदी माध्यमातील १८९ विद्यार्थ्यांना व मराठी माध्यमाच्या ५१ विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्यात आलेला होता. घटनेनंतर संस्थेच्या स्वयंपाकगृहातील उरलेल्या आहाराचा नमुना व इतर साहित्य तपासणीसाठी जी- उत्तर विभागातील मनपा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. शांताई महिला संस्थेकडून सर्व शाळांना पुरवठा करण्याचे कामकाज थांबविण्यात आलेले असून, या शाळांमध्ये पर्यायी संस्थांना आहार पुरवठ्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पालिका आयुक्तांनी घटनेची दखल घेऊन जबाबदार संस्था व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करणे व दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, महापालिका.
खाद्यपदार्थ बनविण्यात येणारे ठिकाण आणि रुग्णालयात जाऊन मी स्वतः विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही मुलांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला, याची डॉक्टर तपासणी करत आहेत. खाद्यपदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यात काही दोष आढळल्यास कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.
- डॉ. डी गंगाधरन, मुंबई पालिका सहआयुक्त (शिक्षण)
विद्यार्थ्यांना होणारा त्रास शिक्षकांच्या त्वरित लक्षात आल्याने दुर्घटना टळली. त्यामुळे या प्रकरणातील भोजन पुरविणाऱ्या संबंधित कंत्राटदार याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
- प्रमोद शिंदे, विभागप्रमुख, ठाकरे गट
विद्यार्थ्यांनी त्रास होतोय, असे सांगितल्यामुळे शिक्षकांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर वेळेत उपचार मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रकृती स्थिर आहे, परंतु या विद्यार्थ्यांचा यात जीवही जाऊ शकला असता, पालक म्हणून आम्ही कोणाकडे दाद मागायची, या प्रकरणाचा प्रशासनाने योग्य तपास करावा.
- अस्लम सिद्धीकी, पालक
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्नबाधेमुळे मूत्रपिंड, यकृतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. २४ तासांनंतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा आढावा घेऊन रुग्णालयातून डिस्चार्ज करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. सुनील पाकळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय