डेबिट कार्ड पिन विचारून १६ हजार लंपास
By admin | Published: January 2, 2015 12:27 AM2015-01-02T00:27:51+5:302015-01-02T00:27:51+5:30
एका खासगी क्षेत्रातील बँकेतून बोलत असल्याचे सांगत बोरीवलीतील एका रहिवाशाचे डेबिट कार्ड पिन क्र मांक विचारून त्याआधारे बचत खात्यातून १६ हजार लंपास करण्याची घटना मंगळवारी घडली.
बोरीवली : एका खासगी क्षेत्रातील बँकेतून बोलत असल्याचे सांगत बोरीवलीतील एका रहिवाशाचे डेबिट कार्ड पिन क्र मांक विचारून त्याआधारे बचत खात्यातून १६ हजार लंपास करण्याची घटना मंगळवारी घडली.
तक्रारदाराच्या मोबाइलवर फोन करणाऱ्या व्यक्तीने कांदिवली पूर्वेतील विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. डेबिट कार्ड बंद झाले असून ते आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी मदत करत असल्याचे फोनवरील व्यक्तीने भासवले. तुम्हाला लगेचच एक चार अंकी डिजिट पिन मोबाइलवर येईल तो सांगा, असे सांगताच तक्रारदाराला एक पिन प्राप्त झाला. फोनवरील अज्ञात व्यक्तीला तो पिन देताच लगेचच तक्रारदाराला १६ हजार रुपये बँक अकाउंटमधून काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर बँकेत विचारणा केली असता कार्ड ब्लॉक केल्याचे कळले. खात्यातील रक्कम एका सार्वजनिक बँक खात्यात जमा झाली आणि नंतर ती एका एटीएम मशिनमधून काढण्यात आल्याची माहिती संबंधित बँकेने दिली.
ज्या बँकेतून पैसे काढले, त्या बँकेत चौकशी केली असता झारखंड येथील मोहमद हैदर अली या व्यक्तीचे ते खाते असल्याचे समजले. गेल्या दोन महिन्यांत त्या व्यक्तीने दोनच ट्रॅन्झॅक्शन केले होते. याबाबत तक्रारदार कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यास गेला असता गुन्हा कांदिवली परिसरातील त्याच्या कंपनीत घडल्याने गुन्हा दाखल करून घेतला नाही.