लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पवईच्या आयआयटी, मुंबई या संस्थेला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल १६० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. हा अज्ञात देणगीदार संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे आयआयटी, मुंबईचे संचालक प्रोफेसर सुभासिस चौधरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले. अलीकडेच इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटीला ३१५ कोटींची देणगी दिली होती.
जगभरात पर्यावरण, हवामान बदल आदी प्रश्न गंभीर झाले असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे संशोधन जगभरात सुरू आहे. त्यातच शाश्वत हरित उर्जा आणि शाश्वत संशोधन केंद्रासाठी आयआयटी, मुंबईच्या विविध माजी विद्यार्थ्यांनी तब्बल १ अब्ज ५०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यात देणगी दिलेल्या एकाही विद्यार्थ्याने आपले नाव जाहीर केले नाही.
संशोधन हबची होणार स्थापना
- माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या सर्व देणगीचा वापर केवळ शाश्वत हरित उर्जा, हवामान बदलावरील संशोधनासाठी करण्यात येणार आहे. तसेच मोठे संशोधन हब स्थापन करण्यासाठी केला जाणार आहे.
- आयआयटी, मुंबईतर्फे हवामान बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर, मानव जातीवर होणारे पर्यावरणीय परिणाम याबाबत अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या देणगीच्या माध्यमातून विविध प्रकारचे संशोधन, नवीन तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे.
देणगीचा वापर संशोधकांच्या नव्या फळीसाठी
आयआयटीमधून हजारो विद्यार्थी संशोधक शास्त्रज्ञ म्हणून जगामध्ये काम करत आहेत. या देणगीचा उपयोग नवीन संशोधकांची फळी पुढे येण्यासाठी तसेच जागतिक हवामान संकटावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी केला जाईल. यामुळेच हरित उर्जा आणि शाश्वत संशोधन केंद्र भविष्यात संस्थेत आकाराला येईल, अशी माहिती आयआयटी, मुंबईचे संचालक प्रा. सुभासिस चौधरी यांनी दिली आहे.