एव्हॉनवर १६०० कोटींचे कर्ज
By admin | Published: May 3, 2016 02:24 AM2016-05-03T02:24:12+5:302016-05-03T02:24:12+5:30
सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीवर सुमारे १६०० कोटींचे कर्ज असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांच्या चौकशीत उघड झाली आहे. कंपनीचे संचालक मनोज जैन यांना
- जितेंद्र कालेकर, ठाणे
सोलापूरच्या ‘एव्हॉन लाईफ सायन्सेस लि.’ या कंपनीवर सुमारे १६०० कोटींचे कर्ज असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांच्या चौकशीत उघड झाली आहे. कंपनीचे संचालक मनोज जैन यांना सल्लागार व अमली पदार्थांच्या व्यवहाराचा म्होरक्या पुनित श्रींगी याच्याकडून ८५ लाख रुपये देण्यात आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून कर्जाच्या खाईत सापडलेल्या कंपनीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याकरिता औषध निर्मितीमधून थेट अमली पदार्थांच्या धंद्यात कंपनीने उडी टाकली का? याची खातरजमा करण्यात येत असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची कमालीची घसरण सुरु असल्याने कामगारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
कंपनीवर सुमारे १६०० कोटींचे कर्ज असल्याची माहिती कंपनीचे एक संचालक अजित कामत यांच्या चौकशीत उघड झाली आहे. ११ वेगवेगळया कंपन्यांचा पसारा असलेल्या या कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर कसा कमी करायचा, या विवंचनेत कामत आणि कैमल असताना दुसरीकडे जैनने पुनितला हाताशी धरुन विकीशी संधान साधले. त्यातूनच हा ड्रग तस्करीचा ‘उद्योग’ सुरु झाला. प्राथमिक तपासात पुनितचा अजित आणि राजेंद्र यांच्याशी संपर्क आल्याचे उघड झालेले नाही. इतरही त्यांच्याविरुद्धचे अजूनतरी पक्के पुरावे हाती लागलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १४ एप्रिल २०१६ रोजी या कंपनीत धाड टाकून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोघांना अटक केली. त्यानंतर या कंपनीतून सुमारे २३ टन इफेड्रीन आणि सुडो इफेड्रीन तसेच अॅसेटीक अनहायड्रेड द्रव असा अडीच हजार कोटींचा माल जप्त करण्यात आला. तेंव्हापासून कंपनीचे संचालक मनोज जैन, अजित कामत आणि राजेंद्र कैमल यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीत जैनला पोलिसांनी अटक केली. त्याच्या आणि आणि पुनितच्या चौकशीत बरीच वेगवेगळी माहिती उघड होत आहे. जैनला आपण ८५ लाख रुपये दिल्याचे पुनितने चौकशीत कबुल केले. ज्या कामगारांच्या मार्फत कंपनीतून माल बाहेर काढायचा आहे, त्यांना खूष ठेवण्यासाठी तो वरचेवर पार्टीही द्यायचा.
कंपनीत किती कच्चा माल आला, किती विकला गेला, त्यातील नेमका किती अधिकृत दाखवला तर किती बेकायदेशीर होता. तसेच परदेशात नेमका कोणाकडे माल पाठविला, याबाबतची चौकशी ठाणे, गुजरात पोलिसांबरोबरच गुप्तचर यंत्रणा तसेच अन्न व औषध प्रशासनाकडूनही केली जात आहे.
विकी गोस्वामीकडून कंपनीला लाखो रुपये
आंतरराष्ट्रीय ड्रगमाफीया विकी गोस्वामी याच्याकडून एव्हॉनला सुमारे ६५ लाख रुपये दिले गेल्याची माहितीही पुनितच्या चौकशीत समोर आली आहे. पुनित, कामत आणि मनोज जैन यांच्या चौकशीतील माहितीची आता खातरजमा करण्यात येत असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शेअर मार्केटमधील भाव गडगडला...
एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीला एकेकाळी शेअर मार्केटमध्ये चांगले नाव होते. त्यामुळे दहा रुपयाचे दर्शनी मूल्य असलेल्या शेअरला ६५ रुपये असा दर मिळत होता. कंपनी बंद पडल्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये हा भाव ४७ रुपये ९० पैसे झाला तर ३० मार्च २०१६ रोजी २८.३५ रुपये असलेला दर कंपनीत धाड पडल्यानंतर एकदम १३ रुपये १६ पैशांवर गडाडला आहे.