१६०० ज्येष्ठ नागरिकांना मिळते ऑक्सिजन थेरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:24 AM2020-06-02T01:24:01+5:302020-06-02T01:24:51+5:30
पालिका घेतेय काळजी : प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी
मुंबई : कोरोनाचे बळी ठरलेल्या ६७ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे गंभीर आजार असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश रुग्ण ६० ते ७० या वयोगटातील होते. ही गंभीर बाब उजेडात आल्यानंतर महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये आतापर्यंत दोन लाख ४२ हजारपैकी एक हजार ६१५ ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांना आॅक्सिजन थेरपीसाठी तात्काळ पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये विविध व्याधींचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूचे प्रमाण ६० वर्षांवरील वयोगटात अधिक आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने २५ एप्रिलपासून मुंबईतील सर्व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेच्या चारशे आरोग्य सेवकांच्या पथकाने मुंबईतील १४ लाख सात हजार घरांमध्ये जाऊन आतापर्यंत दोन लाख ४२ हजार ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एक हजार ६१५ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यांसारखे आजार असल्याचे आढळून आले आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ उपचार देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
कोमॉर्बिड गटातील रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक
रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार या विविध व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ६७ टक्के आहे. त्यामुळे कोमॉर्बिड गटात गणल्या जाणाºया ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी ही ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. त्यामुळे खबरदारी म्हणून अशा व्यक्तींना आॅक्सिजन थेरपी देण्यात येत आहे.
यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण
अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार,
मूत्रपिंड विकार, थॉयराइडविषयक आजार, अनियंत्रित दम्याचा त्रास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा अधिक धोका संभवतो, असे निदर्शनास आले आहे.
कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन
कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचारही करण्यात येत आहेत.