Join us

मुंबईत आतापर्यंत १६ हजार कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:10 AM

दिवसभरात २ मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील दोन्ही कोरोना संसर्गाच्या लाटांची तुलना केली असता दुसऱ्या लाटेची तीव्रता ...

दिवसभरात २ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील दोन्ही कोरोना संसर्गाच्या लाटांची तुलना केली असता दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती. या दोन्ही लाटांमध्ये शहर उपनगरात आतापर्यंत १६ हजार कोरोना बळी गेल्याची नोंद आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत मंगळवारी ३५३ रुग्ण आणि २ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर सध्या ३ हजार ७१८ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात दिवसभरात ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७ लाख २४ हजार ८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १ हजार २६६ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ४७ हजार ७८ आहे. शहर उपनगरात झोपडपट्टी व चाळींच्या परिसरात एकाही प्रतिबंधित क्षेत्राची नोंद नाही, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४९ इतकी आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २ हजार १२५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. पालिकेने दिवसभरात ३८ हजार ४८४ चाचण्या केल्या असून आतापर्यंत ९५ लाख ३ हजार २० कोरोना चाचण्या केल्या आहेत.

चाचण्यांमध्ये घट

मुंबईतील कोरोना चाचण्यांत गेल्या १० दिवसांमध्ये, चाचण्यांच्या संख्येत १२.५ टक्क्यांची आली आहे. १६ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत मुंबईत ३ लाख ८१ हजार ४०७ लोकांची चाचणी घेण्यात आली. म्हणजेच, या कालावधीत सरासरी दररोज ३८,१४० चाचण्या घेण्यात आल्या. २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान मुंबईकरांची ३ लाख ३३ हजार ७३६ कोविड चाचणी करण्यात आली, म्हणजेच दररोज सरासरी ३३,३७३ चाचण्या झाल्या. वरील आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, गेल्या दहा दिवसात चाचणीचा आलेख घसरला आहे.