मोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:44 AM2019-08-18T05:44:04+5:302019-08-18T05:44:17+5:30

मुंबईतील मोेठ्या पायाभूत प्रकल्पांच्या मार्गात आणखी १६०० वृक्ष बाधित ठरणार आहेत.

16000 trees should be cutting for large infrastructure? | मोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड?

मोठ्या पायाभूत सुविधांसाठी १६०० वृक्षांवर कु-हाड?

googlenewsNext

मुंबई : आरे कॉलनीत प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या मार्गात २२३८ वृक्ष कापण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत फेटाळण्यात आला. मुंबईतील मोेठ्या पायाभूत प्रकल्पांच्या मार्गात आणखी १६०० वृक्ष बाधित ठरणार आहेत. यापैकी ७५३ वृक्ष तोडणे आणि ८४७ वृक्षांचे पुनर्राेपण केले जाणार आहे. जनसुनावणीनंतर या वृक्षांचे भवितव्य वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निश्चित होणार आहे.
मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता अशा प्रकल्पांबरोबरच शिवडी येथे मुंबई ट्रेन हार्बर लिंक (एमटीएचएल) तसेच वाकोला येथे कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग या प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एमटीएचएलसाठी वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे. या प्रकल्पाच्या मार्गात ७७२ वृक्ष बाधित आहेत. यापैकी ४५४ तोडणे आणि ५५० वृक्षांच्या रोपणाची परवानगी एमएमआरडीएने मागितली आहे.
तर वाकोला येथील उन्नत मार्गासाठी ६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव आहे. उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. विकासकामांसाठी वृक्ष तोडण्याची परवानगी मागणारा हा पहिला प्रस्ताव नाही. महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेडसाठी तब्बल दोन हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र विकासाच्या नावाखाली सतत वृक्षांची छाटणी होत राहिल्यास मुंबईतील हरित पट्टाच नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

२२ आॅगस्टला जनसुनावणी...
या प्रस्तावांवर वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्याआधी २२ आॅगस्ट रोजी जनसुनावणी होणार आहे. या सुनावणीत नागरिकांना आपल्या सूचना व हरकती मांडता येणार आहेत. यामध्ये लोकांकडून या प्रस्तावाला जास्त विरोध झाल्यास वृक्ष प्राधिकरणामार्फत हा प्रस्ताव फेरविचारार्थ एमएमआरडीएकडे पाठविला जाणार आहे.

62 धोकादायक वृक्ष महापालिका तोडणार
मुंबईत गेल्याच आठवड्यात मुलुंड येथे रिक्षावर वृक्ष कोसळल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. पावसाळ्यात अशा प्रकारचा हा चौथा मृत्यू असल्याने पालिकेच्या उद्यान विभागाचे धाबे दणाणले आहे. ६२ धोकादायक व मृत वृक्ष लवकरच तोडण्यात येणार आहेत.

Web Title: 16000 trees should be cutting for large infrastructure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई