पोलिसांच्या १,६०८ जागा; अडीच लाख अर्ज, भरती प्रक्रिया झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:40 AM2018-03-13T05:40:37+5:302018-03-13T05:40:37+5:30
वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक सुशिक्षित तरुण मिळेल त्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वच विभागांच्या भरतीच्या वेळी दिसते. आठ जिल्ह्यांमधील १,६०८ पोलीस शिपाई पदासाठी राज्यातून तब्बल २ लाख ५४ हजार ३७२ पुरुष व महिला उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
मुंबई : वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक सुशिक्षित तरुण मिळेल त्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वच विभागांच्या भरतीच्या वेळी दिसते. आठ जिल्ह्यांमधील १,६०८ पोलीस शिपाई पदासाठी राज्यातून तब्बल २ लाख ५४ हजार ३७२ पुरुष व महिला उमेदवारांचे अर्ज आले आहेत. सोमवारपासून शारीरिक चाचणीने भरती प्रक्रिया सुरू झाली.
नागपूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून शारीरिक चाचणी सुरू झाली. १२ ते २३ मार्च या कालावधीत सर्व जिल्ह्यांत मैदानी चाचणी घेतली जाणार आहे़
खुला गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमातीअ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ही भरती होत आहे. भरतीसाठी रविवारी रात्रीपासूनच पोलीस अधीक्षक कार्यालयात उमेदवार ठाण मांडून होते़ कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी सकाळी झेरॉक्स दुकानांबाहेर रांगा लागल्याचेही चित्र होते.
पोलीस भरतीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन असून ओळखपत्र वा शेड्यूल पुढील काही दिवसांत उमेदवारांना कळेल़ काहींना ओळखपत्र वा शेड्यूल न मिळाल्यास त्यांच्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयास कळवून त्यांच्या मार्गदर्शनातून उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाईल़, असे नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले.
>उच्चशिक्षित उमेदवारांचा भरणा
विशेष म्हणजे अर्जदारांमध्ये अभियांत्रिकी व फार्मसी आदीचे उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.
जिल्हा जागा अर्ज
नागपूर ३९८ ५५,५१५
पुणे ३७४ ७९,५४०
नाशिक ८२ २१,०८४
अहमदनगर १६४ ३१,०७३
रायगड १०९ १२,०५५
रत्नागिरी १९४ २९,४९०
सिंधुदुर्ग ७१ १०,१७६
सातारा १०४ १८,०००