आरटीईच्या जागांसाठी १६,३२६ बालकांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:40 AM2019-04-03T06:40:38+5:302019-04-03T06:41:01+5:30
पंचवीस टक्यांसाठी १३,४०० अर्ज : लॉटरी पद्धतीने निवड होणार
सुरेश लोखंडे
ठाणे : उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, केजी ते पहिलीच्या वर्गासाठी एकूण १६ हजार ३२६ बालकांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. त्यातून लवकरच लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. खाजगी शाळांमध्ये बालकांना पूर्व प्राथमिक (केजी)ते पहिलीच्या वर्गाचे २५ टक्के शालेय प्रवेश शिक्षणाच्या हक्क कायद्यांतर्गत असलेल्या आरक्षणातून मोफत मिळणार आहेत.
इंग्रजी माध्यमासह दर्जेदार शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा केजी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी आणि शुल्क वसूल करीत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय परिवारातील बालकांना यापासून वंचित राहावे लागते. यास आळा घालण्यासाठी आता शाळांमधील एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवून या बालकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी १६ हजार ३२६ अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाले आहेत.
गरिब, मागासवर्गीय व आर्थिकदृट्या दुर्बल घटकाच्या कुटुंबातील बालकांना जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये १३ हजार ४०० शालेय प्रवेश दिला जाणार आहे. लॉटरी पध्दतीने या प्राप्त अर्जांतून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
आरटीईच्या या २५ टक्के आरक्षणातून विद्यार्थ्यांना २०१९ -२० या शैक्षणिक वर्षासाठी केजी व पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील ६४० शाळांमध्ये १६ हजार ५४६ प्रवेश आरक्षित ठेवले होते. यंदा शाळांची संख्या १२ ने वाढीली असली, तरी त्यातील प्रवेश क्षमता सुमारे तीन हजार १४६ ने कमी झाली आहे.
शहरनिहाय शाळा, उपलब्ध जागा आणि प्राप्त अर्ज
शहर शाळा पहिली केजी जागा अर्ज
अंबरनाथ ५५ ९३८ १७० १२४७
भिवंडी २८ ५२५ १९५ २२४३
भिवंडी ग्रा. ३४ ६७८ ००० ४४९
कल्याण ५३ ११७७ १२० १०७८
केडीएमसी ८१ १४९६ ०१३ १६७८
मीरा भार्इंदर ९१ १३१४ ००० ०८२
मुरबाड १५ १५८ ००० ०६०
नवी मुंबई १०५ २०८२ ४८० ४७४८
शहापूर ३४ ४१५ ०५४ ४५३
ठाणे मनपा ७६ १४३१ २०० ११७७
ठाणे२ ६३ १२३४ ३२९ २२२७
उल्हासनगर १७ ३२८ ०६३ ८८३
जिल्ह्यातील शाळांमध्ये आरक्षित ठेवलेल्या या १३ हजार ४०० प्रवेशापैकी ११ हजार ७७६ बालकांना पहिलीमध्ये, तर एक हजार ६२४ प्रवेश पूर्वप्राथमिक म्हणजे केजीत दिले जाणार आहेत.