पश्चिम रेल्वेला जाहिरात, दुकानभाड्यांतून १६४ कोटींचे उत्पन्न; १९ महिन्यांतील कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:19 IST2024-11-25T15:18:18+5:302024-11-25T15:19:08+5:30
होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट, दुकानभाडे (एनएफआर) अशा माध्यमातून पश्चिम रेल्वेला एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या १९ महिन्यांमध्ये १६४ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेला जाहिरात, दुकानभाड्यांतून १६४ कोटींचे उत्पन्न; १९ महिन्यांतील कमाई!
महेश कोले
मुंबई :
होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट, दुकानभाडे (एनएफआर) अशा माध्यमातून पश्चिम रेल्वेला एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या १९ महिन्यांमध्ये १६४ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तिकीट विक्री व्यतिरिक्त मिळालेल्या या महसुलात मुंबई विभागाचा वाटा ११५ कोटी ६९ लाख रुपये आहे. दरम्यान, रेल्वेने २०२३-२०२४ या मागील आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा एक कोटी ३१ लाख रुपयांचा अधिक महसूल मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षांतही असाच प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘एनएफआर’च्या माध्यमातून महसूल वाढीसाठी रेल्वेने त्यांच्या जागांचा वापर केला आहे. त्यात स्टेशनबाहेर होर्डिंग, एसी-नॉन एसी लोकल, मेल-एक्स्प्रेस ट्रेनवरील जाहिराती, रेल्वेस्थानकांवरील जाहिराती, डिजिटल स्क्रीन, रेस्टॉरंट ऑन व्हील्स, रेल्वे फलाटांवरील दुकानांतून मिळालेल्या महसुलाचा समावेश आहे. यातील सर्वाधिक वाटा सात एसी लोकलमधील जाहिरातींचा असून, त्याद्वारे वार्षिक १७.९४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, ७४ नॉन एसी लोकलच्या आतील आणि बाहेरील जाहिरातींमधून ५४.१३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
रेल्वेने प्रशासनाने स्थानकांवरील संपूर्ण जागा एकाच कंत्राटदारास दिल्यास त्यांना अधिक महसूल मिळू शकतो. डिजिटल जाहिरातींवर भर दिल्यास त्याचाही फायदा मिळू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
चित्रीकरणामुळेही तिजोरीत भर
मध्य आणि पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीसाठी विविध स्रोत निर्माण केले आहेत. त्याचाच भाग म्हणून विविध रेल्वे स्थानके तसेच लोकलमध्ये चित्रीकरणालाही परवानगी दिली आहे. त्यातून रेल्वेला चांगला महसूल मिळत आहे.
एनएफआरच्या माध्यमातून अधिक महसूल मिळविण्यासाठी पश्चिम रेल्वे आपल्या जागांचा वापर चांगल्या रीतीने करत आहे. भविष्यात एनएफआरद्वारे अधिक महसूल मिळविण्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत.
- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
५४.१३ कोटी रुपयांचा महसूल ७४ नॉन एसी लोकलच्या आतील आणि बाहेरील जाहिरातींमधून मिळाला