पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत सभा चालू असताना मुलुंडमध्ये उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला होता. आता या प्रकरणी दोन महत्वाच्या अपडेट आल्या आहेत.
भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या वॉर रूम मधून १ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रक्कमेबाबत अधिक चौकशी सुरू आहे. रक्कम ताब्यात घेतली तेव्हा योग्य माहिती देता न आल्याने ती रक्कम जप्त करत चौकशी सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले आहे.
तर दुसरीकडे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर कोटेचा यांनी तुमचे काळे धंदे बंद करणार, असा इशारा दिला आहे. याचे पडसाद आजही उमटण्याची चिन्हे असून महायुतीची सभा संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोटेचा यांच्या कार्यालयाकडे धाव घेत भेट दिली होती. भाजपच्या वॉर रुममध्ये पैसे मोजण्याचे आणि वाटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता. घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य लाठीचार्ज केला. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते.