वर्षभरात रूळ ओलांडताना १,६५३ ठार

By admin | Published: January 2, 2017 07:01 AM2017-01-02T07:01:48+5:302017-01-02T07:01:48+5:30

रूळ ओलांडण्याचा धोका पत्करू नका, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जाते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत, प्रवाशांकडून जीव धोक्यात घातला जातो.

1,653 killed when crossing the crossing | वर्षभरात रूळ ओलांडताना १,६५३ ठार

वर्षभरात रूळ ओलांडताना १,६५३ ठार

Next

मुंबई : रूळ ओलांडण्याचा धोका पत्करू नका, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जाते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत, प्रवाशांकडून जीव धोक्यात घातला जातो. यात काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागतात. २0१६ मध्ये रूळ ओलांडताना १ हजार ६५३ जण ठार झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे, तर ३४८ लोक जखमी झाले आहेत. यापैकी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक २२६ जण रूळ ओलांडताना ठार झाले आहेत. त्यानंतर, ठाणे, कुर्ला, बोरीवली, वसईचा नंबर लागतो.
रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कठोर कारवाई केली जाते, तरीही रूळ ओलांडण्याचा धोका प्रवासी पत्करतात. शॉर्टकटचा पर्याय निवडत रूळ ओलांडले जातात आणि यात प्रवाशांना लोकलची धडक लागून प्राण गमवावे लागतात. संरक्षक भिंतीला भगदाड पाडून किंवा पादचारी पूल असूनही, त्यावरून जाण्याचा कंटाळा करणे इत्यादी कारणेही रूळ ओलांडण्यास कारणीभूत ठरतात. प्रवाशांनी जास्तीत जास्त पादचारी पुलांचा वापर करावा आणि रूळ ओलांडणे कमी व्हावे, यासाठी मध्य, पश्चिम व मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून पादचारी पूलही बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच या आधीही काही पादचारी पूल बांधताना, ते स्कायवॉकलाही जोडण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून तर दोन रेल्वे स्थानकांदरम्यानही रूळ ओलांडण्याची ठिकाणे शोधून, त्या ठिकाणीही पादचारी पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांचे रूळ ओलांडण्याचे प्रमाण पाहता ते अधिक असून, त्यातून अपघातांनाच निमंत्रण दिले जाते. २0१६ मध्ये रूळ ओलांडताना १ हजार ६५३ जण ठार झाले असून, मध्य रेल्वेवर १ हजार ६८ तर पश्चिम रेल्वेवर ५८५ जण ठार झाल्याची नोंद आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक अपघातांची नोंद झाली आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत २२६ जण ठार आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत २0९ जण ठार झाल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: 1,653 killed when crossing the crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.