Join us

कारमधून १६७ किलो गांजा जप्त, महिलेसह तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 5:55 AM

गेल्या महिन्यात विशाखापट्टणम येथून ५०० किलोचा गांजा जप्त केल्यानंतर तेथूनच आलेल्या १६७ किलो गांजाची तस्करी रोखण्यास अमली पदार्थविरोधी पथकाला (एएनसी) यश आले.

मुंबई : गेल्या महिन्यात विशाखापट्टणम येथून ५०० किलोचा गांजा जप्त केल्यानंतर तेथूनच आलेल्या १६७ किलो गांजाची तस्करी रोखण्यास अमली पदार्थविरोधी पथकाला (एएनसी) यश आले. टुरिस्ट कारमधून गांजाची तस्करी करण्यात आली होती. या प्रकरणी एका महिलेसह तरुणाला एएनसीने बेड्या ठोकल्या आहेत.तौसिफ रफिक खान (१९), परवीन कासमली जाफरी (४७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. विशाखापट्टणम येथून ते हैदराबादमार्गे टुरिस्ट कारने मुंबईत दाखल झाले. सोबत कुटुंब आहे असे वाटावे म्हणून महिला मागे एकटीच बसली होती. तर खान हा गाडी चालवत होता. दरम्यान, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात एका कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती एएनसीला मिळाली. त्यानुसार, एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपरच्या एएनसी युनिटने या ठिकाणी सापळा रचला. दोघांच्याही झडतीतून तब्बल १६७ किलो गांजा जप्त करण्यात आला. खान हा नालासोपारा येथील रहिवासी आहे तर जाफरी ही साकीनाका येथे राहते.यापूर्वी केलेल्या कारवाईत जळगाव, खान्देश आणि नाशिक मार्गे हा गांजा मुंबईत आणण्यात आला होता. मात्र अटकेच्या भीतीने त्यांनी मार्ग बदलला आणि ते हैदराबादमार्गे मुंबईत दाखल झाले. मात्र मुंबई पोलिसांनी शिताफीने त्यांना बेड्या ठोकल्या. कारही जप्त करण्यात आली आहे.>१ किलोमागे अडीच लाख रुपये१ किलो गांजामागे त्यांना अडीच लाख रुपये मिळणार होते. गांजा पाठविणाऱ्या वितरकाच्या ओळखीतून हा माल थेट मुंबईत आणण्यात आला आहे. मूळ वितरक तसेच माल खरेदी करणारे या दोघांची माहिती मिळाली असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती एएनसीने दिली.यापूर्वीही मुंबईत गांजाची तस्करीजाफरीने यापूर्वीही मुंबईत गांजाची तस्करी केल्याचे तिच्या चौकशीत समोर आले. मात्र आतापर्यंत किती गांजाची तस्करी केली, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एएनसीने सांगितले.