मुंबई : सिमेंट निर्मिती करणाऱ्या मुंबईस्थित वद्राज सिमेंट कंपनीने पंजाब नॅशनल बँकप्रणीत १० बँकांना १६८८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणी मुंबई, जयपूर येथे तीन ठिकाणी छापेमारी करत काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी कंपनी तसेच कंपनीचे प्रवर्तक संचालक ऋषी अगरवाल, कृष्ण गोपाल, विजय प्रकाश शर्मा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने गुजरातमधील सुरतनजीक असलेल्या मोरा या गावात सिमेंट निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी पंजाब नॅशनल बँकप्रणीत १० बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जप्राप्त रक्कम अन्य उपकंपन्यांमध्ये फिरवली होती. तसेच काही बनावट कंपन्या स्थापन करून त्याद्वारेदेखील या रकमेची फिरवाफिरवी करत कर्ज थकवले होते. या प्रकरणी कंपनीचे खाते २०१८ मध्ये थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पंजान नॅशनल बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीवरून सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.