आधार कार्डसाठी १६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ; शिक्षक, पालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:52 AM2017-10-05T02:52:20+5:302017-10-05T02:52:58+5:30
मुंबईसह राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत सरल प्रणालीवर आधार कार्ड अपलोड करणे सर्व शाळांना बंधनकारक होते
मुंबई : मुंबईसह राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत सरल प्रणालीवर आधार कार्ड अपलोड करणे सर्व शाळांना बंधनकारक होते. पण, अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, काही ठिकाणी अपलोड होत नाही अशा समस्यांमुळे शिक्षक त्रस्त झाले होते. पण, आता सरल प्रणालीवर आधार कार्ड अपलोड करण्यासाठी १६ आॅक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याने शिक्षक आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
शाळांच्या संचमान्यतेसाठी सरल प्रणालीवरील आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार असल्यामुळे शाळांवर दबाव होता. त्यामुळे शाळांनी पालकांवर दबाव टाकला होता. पण, मुंबईत आधार केंद्रे कमी असल्याने पालकांची पायपीट होत होती.
विद्यार्थ्यांची माहिती भरताना अनेक अडचणी येत आहेत. माहिती भरताना विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार कार्ड, नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी व जुन्या विद्यार्थ्याचे अपडेट भरावयाचे असल्याने शिक्षकांवर व शिक्षकेतर कर्मचाºयांवर अशैक्षणिक कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू झाल्या असल्याने परीक्षांचे आयोजन व सरलची माहिती भरण्याची दुहेरी कसरत शिक्षकांना करावी लागत होती. माहिती अपलोड न होणे, नेटवर्क जाणे, संकेतस्थळ अचानक बंद होणे यामुळे शिक्षकांना अडचणी येत होत्या. त्यातच माहिती भरण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली होती. शाळांची मागणी लक्षात घेऊन अखेर संचालकांनी १६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.