मुंबईमुंबई महानगरपालिकेचा आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या 'कोस्टल रोड'चं काम नेमकं कसं? आणि कुठवर आलंय? याची माहिती मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वांद्रे-वरळी सीलिंक अशा पहिला टप्प्यातील काम सध्या सुरु असून यासाठी १२,७२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत यासाठी १२८१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईत बोरीवलीपर्यंत कोस्टल रोडचा संपूर्ण प्रकल्प आहे. संपूर्ण प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्णत्वास येईल असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचं काम खरंतर २०२२ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण कोविड संकटामुळे काम रखडल्याने आता ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होईल. "कोस्टल रोडच्या कामाला आता वेग आला असून नोव्हेंबर २०२० पर्यंत १२८१ कोटींचा खर्च झाला आहे. आतापर्यंत एकूण प्रकल्पापैकी १७ टक्के काम पूर्ण झालं आहे", अशी माहिती चहल यांनी दिली.
कोस्टल रोडसाठी १७५ एकर अरबी समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात आला असून आणखी १०२ एकर जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे ठरणार आहेत. बोगद्यांचं काम ७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं चहल यांनी सांगितलं.
बोगदा तयार करणाऱ्या मशीनला 'मावळा' असं नाव देण्यात आलं आहे. मरीन लाइन्स ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत १,९२० मी लांबीचे दोन बोगदे 'मावळा' मशीनमधून तयार केले जाणार आहेत. 'सीआरझेड'च्या मंजुरीसाठी मुंबई हायकोर्टाने २०१९ मध्ये कोस्टल रोडच्या कामावर स्थगिती आणली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे.