लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला ‘राब्ता’ या चित्रपटासाठी मिळालेल्या १७ कोटींचा हिशेब लागलेला नाही. सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) त्याबाबत सर्व आर्थिक व्यवहार तपासूनही ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. शिवाय निर्माता दिनेश विजयन यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रांतून त्याबाबत काहीच स्पष्टता हाेत नसल्याने त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
सुशांतला १७ कोटींचे पेमेंट कोठे व कसे केले? परदेशात चित्रीकरणावेळी देण्यात आलेली रक्कम व अन्य भत्ते कोणत्या स्वरूपात दिले होते, याबाबत ईडीने विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या विजयन हे कामानिमित्त दुबईत आहेत. काेराेना झाल्यामुळे उपचार सुरू असल्याने त्यांनी ईडीला चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शविली होती.
१४ जूनला वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतने गळफास लावून घेतला होता, मात्र त्याच्या कुटुंबीयांनी त्याबाबत त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करीत आहे. सुशांतची संपत्ती हडप केल्याच्या आरोपावरून मनी लॉन्ड्रिंगबद्दल गुन्हा दाखल करून गेल्या ४ महिन्यांपासून ईडी तपास करीत आहे. राब्ता चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला त्यावेळी रिया सुशांतच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे ही रक्कम गहाळ होण्यात तिचा काहीही संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.