खासगी कंपनीला १७ कोटींना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:14+5:302020-12-15T04:24:14+5:30
मालाच्या व्यवहारात केली अफरातफर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खरेदी केलेल्या मालाच्या व्यवहारात अफरातफर करून एका खासगी कंपनीला १७ ...
मालाच्या व्यवहारात केली अफरातफर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खरेदी केलेल्या मालाच्या व्यवहारात अफरातफर करून एका खासगी कंपनीला १७ कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार कुलाबा येथे समोर आला. या प्रकरणी रविवारी कुलाबा पोलिसांनी कंपनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
कुलाबा येथील खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या ॲग्राे विभागाचा २०१९ मध्ये अहवाल आल्यानंतर त्यात प्रोसेस लॉस म्हणजे शेतमालातून दगड, माती, कचरा इत्यादी वस्तूंचे वजन २१ टक्के दाखविले हाेते. नेहमी ५ टक्क्यांवर असलेला प्रोसेस लॉस अचानक वाढल्याने कंपनीला संशय आला. कंपनीने फॉरेन्सिक ऑडिटर यांचा अहवाल तपासला असता सांगली येथील हळद व मिरचीचा पुरवठादार लतीफने २०१८ साली कंपनीच्या नावाने खरेदी केलेली सुमारे १ हजार ८० मेट्रिक टन हळद व सुमारे २७१ मेट्रिक टन मिरची असा एकूण १२ कोटी ३३ लाख ४४ हजार ९९२ रुपये किमतीचा माल कंपनीला दिला नसल्याचे समोर आले.
दुसरीकडे कंपनीच्या ॲग्रो विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमत करून कंपनीला गंडा घातल्याचेही समोर आले. यात २०१२ पासून कंपनीचे तब्बल १७ कोटी १६ लाख रुपयांचे नुकसान केले. त्यानुसार कंपनीच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी कुलाबा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
.....