अमर शैला, मुंबई: मध्य रेल्वेने दोन महिन्यात प्रवासी तिकीटांव्यतिरिक्त अन्य माध्यमातून विक्रमी असा १७ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. त्यामध्ये वार्षिक परवाना शुल्कासह १७ निविदा देऊन केवळ मे महिन्यात ई लिलावाद्वारे १०.३० कोटी रुपये कमाविले आहेत.
मध्य रेल्वेकडून रेकवर बाह्य जाहिरातींसाठी कंत्राट दिले जाते. त्याचबरोबर होर्डिंग, स्थानकांवर नॉन डिजिटल जाहिराती, पादचारी पुलांवर जाहिरातींच्या माध्यमातून महसूल मिळविण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. यंदा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन महिन्यातच मध्य रेल्वेच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात कुर्ला कारशेडच्या १२ ईएमयू रेकवर बाह्य जाहिरातींसाठी ३ वर्षांचे कंत्राट दिले आहे. त्यामाध्यमातून मध्य रेल्वेला दरवर्षी ७१ लाख रुपये मिळणार आहेत. तर नाहूर, मानखुर्द, भायखळा येथे प्रत्येकी १ आणि पनवेल येथे ५ नवीन होर्डिंगसाठी करार करण्यात आला आहे.
यात ५ वर्षांच्या कालावधीसाठी हा करार झाला असून त्यामध्ये दरवर्षी ७.१७ लाख रुपये मिळणार आहेत. तर भांडुप आणि शीव रेल्वे स्थानकांवर नॉन-डिजिटल जाहिरात अधिकारांसाठी ३ वर्षांसाठी २ नवीन करार झाले असून त्यातून दरवर्षी ९५.६२ लाख रुपयांची कमाई होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अन्य काही करार - नाशिकरोड येथे पार्सल स्कॅनरसाठी ५ वर्षांच्या कालावधीकरिता १ नवीन करार. वार्षिक ४.१४ लाख रुपयांची कमाई- नागपूर स्टेशनवर नवीन पादचारी पूल आणि पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावर आणि फलाट क्रमांक १ वर नॉन-डिजिटल जाहिरात अधिकारांचे ३ वर्षांचे करार. दरवर्षी ९६.८८ लाख रुपये मिळणार.- पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ ते ६ वर जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी १ नवीन करार. दरवर्षी २४ लाख रुपये मिळणार.- सोलापूर-दौंड-सोलापूर विभागातील नॉन-कॅटरिंग वस्तूंच्या विक्रीसाठी सोलापूर विभागाकडून ३ वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट. दरवर्षी ९.२१ लाख रुपये उत्पन्न मिळणार.