साडेचार वर्षात १७ कोटींची कामे
By admin | Published: January 13, 2015 10:42 PM2015-01-13T22:42:41+5:302015-01-13T22:42:41+5:30
प्रभाग कमांक ७ मधील परिसराचा आगाशी ग्रामपंचायत क्षेत्रात समाविष्ठ होता. या प्रभागात काही प्रमाणात नागरीसंकुले आहेत
दिपक मोहिते, वसई
प्रभाग कमांक ७ मधील परिसराचा आगाशी ग्रामपंचायत क्षेत्रात समाविष्ठ होता. या प्रभागात काही प्रमाणात नागरीसंकुले आहेत तर स्थानिकांनी बंगलेवजा आपल्या वास्तू उभारल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षात महानगरपालिकेच्या फंडातुन येथील विकासकामांसाठी १७ कोटी रू. खर्च करण्यात आले आहे. त्यामध्ये रस्ते, भूमीगत गटारे व अन्य विकासकामांचा समावेश आहे.
पूर्वीपासून येथील लोकांचा भर विहिर व बोअरींगवर आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून पाणी मिळेल अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ करीत नाहीत.काही प्रमाणात विकासकामे झाली असली तरी प्रभागाचा मागासलेपणा अद्याप दूर होऊ शकलेला नाही. दैनंदिन साफसफाई, वैद्यकीय सेवा व अन्य सुविधा माफक प्रमाणात या प्रभागात उपलब्ध आहेत. महानगरपालिका स्थापन करताना झालेला विरोध आता मावळला आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रचारामध्ये महानगरपालिका विरोधाचा प्रमुख मुद्दा होता. परंतु आता ग्रामस्थांचा विरोध मावळल्यामुळे पुढे येणारी निवडणुक चांगलीच संघर्षमय होण्याची शक्यता आहे. भविष्यात महानगरपालिकेतर्फे बोळींज, आगाशी व अन्य परिसरात नळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु त्यासाठी नागरीकांना लोकवर्गणी द्यावी लागणार आहे. पूर्वी हा संपूर्ण परिसर नगरपरिषद परिक्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे त्यावेळी ग्रामीण भागातील अशा गावांना पाणीपुरवठा योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात आले नव्हते. आता वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची गरजही वाढणार आहे. विहिरी किंवा कूपनलीका या अपुऱ्या पडण्याची शक्यता असून लवकरात लवकर नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रयत्नशील आहे.